माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे पाठोपाठ कथित पत्रकार देवेंद्र जैनला गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:58 PM2021-07-13T15:58:24+5:302021-07-13T21:40:41+5:30
संबंधित गुन्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्हाटे, यांच्यासह १३ जणांवर गुन्हा मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
पुणे : जमीन बळकावणे, धमकाविणे, खंडणी अशा विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर मोक्काखाली कारवाई केल्यावर फरार झालेला पत्रकार देवेंद्र जैन याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या ऑक्टोंबरमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे याच्यासह १३ जणांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. तेव्हापासून तो फरार होता.
रवींद्र बर्हाटे या टोळीप्रमुखाने देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व इतरांच्या सहाय्याने अनेकांना जमीन व्यवहारात फसवणूक केली. त्यांच्या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यांना दमकावून खंडणी वसुल केली आहे. या टोळीवर असे १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात देवेंद्र जैन याच्याविरुद्ध बंडगार्डन, कोथरुड, हडपसर, समर्थ, हडपसर, चतु:श्रृंगी असे ८ गुन्हे दाखल आहेत. त्यातील हडपसर आणि चतु :श्रृंगीच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन देवेंद्र जैनसह चौघांना अटक केली होती. या गुन्ह्यात देवेंद्र जैन याला जामीन मिळाला होता. हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली. त्यानंतर देवेंद्र जैन फरार झाला होता.
या टोळीचा प्रमुख रवींद्र बर्हाटे याची पत्नी, मुलगा यांना पोलिसांनी अटक केली. दीड वर्षे फरार असलेला रवींद्र बर्हाटे हा पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर आता देवेंद्र जैनसमोरही पर्याय न राहिल्याने आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत हजर झाला. पोलिसांनी त्याला हडपसरच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
.......
राजस्थान, गुजरातपर्यंत पळाला
देवेंद्र जैन हा पुण्यातून पळून गेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लपून रहात होता. तोकाही दिवस अहमदनगर, ठाणे येथे राहिला होता. त्यानंतर राजस्थान, गुजरातमध्ये काही दिवस राहिला. तेथून तो हैदराबाद येथे गेला होता. असे त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पुढे आले आहे