पुणे : आमच्या वडिलांच्या आग्रहामुळे हातात पाटी पुस्तक घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. स्वत: च्या पोटाला चिमटे काढून मुलांच्या शिक्षणाला आमच्या वडिलांनी महत्त्व दिले नसते तर आमच्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या पायाची भिंगरी थांबलीच नसती, शेळ्या मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या धनगर जमातीला समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे, अशा शब्दांत मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर राहणाऱ्या आणि रोजच्या संघर्षाला नेटाने तोंड देणाऱ्या धनगरवाड्यातील परिस्थितीतही शिक्षणाचा वसा घेऊन पुढे जाणाऱ्या घोंगडी ते लेखणीचा प्रवास धनंजय धुरगुडे यांनी उलगडून दाखविला आणि सुहृदयांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.निमित्त होते, रोहन प्रकाशनाच्या ३५व्या वर्षानिमित्त आयोजित सुहृदांच्या स्नेहमेळाव्याचे. रोहन प्रकाशनाच्या ‘माझा धनगरवाडा’ या पुस्तकाचे लेखक धनंजय धुरगुडे यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, विद्या बाळ, लेखक अच्युत गोडबोले, जयप्रकाश प्रधान, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, चित्रकार रवी परांजपे, लेखिका मंगला गोडबोले, डॉ. आशुतोष जावडेकर, संजय भास्कर जोशी, किशोर चे संपादक किरण केंद्रे तसेच रोहन प्रकाशनाचे प्रमुख प्रदीप चंपानेरकर आणि रोहन चंपानेरकर उपस्थित होते. दलित आणि मागास समाजाची काही आत्मकथने वाचल्यापासून माझ्याही मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे आपणही आपला आणि आपल्या समाजाचा संघर्ष पुस्तक रूपाने मांडावा या भावनेतून मी हे पुस्तक लिहिले. सुमारे अडीच वर्ष मी पुस्तकाचे लेखन करीत होतो आणि माझे हे अनुभव प्रत्यक्ष पुस्तक रूपात हाती आल्यानंतर हे पुस्तक म्हणजे मला माझे प्रतिबिंबच वाटले, अशी भावना धुरगुडे यांनी व्यक्त केली.
उलगडला ‘माझा धनगरवाडा’चा प्रवास; धनंजय धुरगुडे यांचा पुणेकर रसिकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 5:40 PM
धनगर जमातीला समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे, अशा शब्दांत घोंगडी ते लेखणीचा प्रवास धनंजय धुरगुडे यांनी उलगडून दाखविला आणि सुहृदयांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
ठळक मुद्देरोहन प्रकाशनाच्या ३५व्या वर्षानिमित्त सुहृदांचा स्नेहमेळावाअनुभव पुस्तक रूपात हाती आल्यानंतर हे पुस्तक म्हणजे मला माझे प्रतिबिंबच वाटले : धुरगुडे