पुरंदरच्या तहसील कार्यालयात तहसीलदारांशिवायच होतेय न्यायदानाचे काम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:29+5:302021-02-06T04:17:29+5:30
पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयाविरोधात कारभाराच्या अनेक तक्रारी नागरिक करीत असतात. या सर्व तक्रारी वेगवेगळ्या विभागाबाबत असतात. मात्र, आता खुद्द ...
पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयाविरोधात कारभाराच्या अनेक तक्रारी नागरिक करीत असतात. या सर्व तक्रारी वेगवेगळ्या विभागाबाबत असतात. मात्र, आता खुद्द तहसीलदारांच्या अधिकाराचा वापर थेट लिपिकच करत असून लिपिकच न्यायदान प्रक्रियेवर शेरे मारत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली आहे. याबाबत पिंगोरी येथील सागर सुतार असे या तक्रारदाराचे नाव असून, त्यांनी याबाबत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याकडेही याबाबत तक्रार केली.
सुतार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवार, दि. २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या १५५ नुसार सुरू असलेल्या प्रकरणी तारीख होती. सकाळी अकरा वाजता कार्यालयात गेल्यावर तहसीलदारांनी दुपारी दोननंतर तारखा घेणार असल्याचे सांगितले. दुपारी तारखांची सुनावणी सुरू झाली तेव्हा तहसीलदार उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत येथील लिपिक सुनावणी घेत होते. सुतार यांच्या प्रकरणावर त्यांनी निकालावर असा शेराही मारला. त्या वेळी सुतार यांनी लिपिकाला हटकले व तुम्हाला असा शेरा मारण्याचा आधिकर नसताना तुम्ही शेरा करा मारला, असा प्रश्र्न केला. त्यावेळी लिपिकाची भंबेरी उडाली. त्यानंतर या कारभाराची माहिती सुतार यांनी आमदर संजय जगताप यांना दिली.
--
चौकट
सुतार यांचा हा खोडसाळपणा : सरनोबत
दरम्यान, याबाबत पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांचेकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, असा कोणताही प्रकार या कार्यालयात होत नाही. संबंधित लिपिक लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपस्थितांच्या सह्या घेत होता. मात्र, सुतार याने खोडसाळपणाने ही तक्रार केली आहे. आता आम्ही कोणाच्याही अशा प्रकारच्या सह्या घेणार नाही. आम्ही लोकांच्या सोयीसाठी केले होते. मात्र, त्याचा गैरफायदा घेतल असल्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात येईल त्यामुळे नागरिकांची गैरसोय होईल ती करण्यासाठी आम्ही उपाय शोधू.