के़.वेंकटेशम पुण्याचे नवे पोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:38 PM2018-07-30T16:38:10+5:302018-07-30T16:50:31+5:30
गेले अनेक महिने लांबणीवर पडलेल्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आॅर्डर अखेर जाहीर झाली असून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे : गेले अनेक महिने लांबणीवर पडलेल्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आॅर्डर अखेर जाहीर करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची महामार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बदली झाली आहे़. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक आऱ. के़. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिरिक्त महासंचालक (कारागृह) डॉ़ भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत़. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजयकुमार हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतील़. त्यांच्या जागी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे याची नियुक्ती झाली आहे़. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांची ठाणे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे़.
अपर पोलीस महासंचालक वैध मापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांची प्रधान सचिव, (विशेष) गृह विभाग येथे बदली झाली आहे़. प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग रजनिश शेठ यांची अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे़ .
पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या मुळच्या अलाहाबाद असून त्या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत़. त्यांनी अलाहाबाद युनिर्व्हसिटीमधून पदवी घेतली आहे़. त्यांनी भूगर्भ शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे़. त्यांनी मुंबई पोलीस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे़. मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे़. त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त काम केले आहे़ . एक शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात विशेष ओळख आहे़.
रश्मी शुक्ला यांनी ३१ मार्च २०१६ रोजी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला़. मीरा बोरवणकर यांच्या नंतर त्या दुसऱ्या महिला पोलीस आयुक्त ठरल्या़ त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी अनेक चांगली पावले उचलली़. विशेषत: महिला आणि तरुणीच्या साठी अनेक योजना बनविल्या़ .बडीकॉप, पोलीस काका यासारखे उपक्रम सुरु केले़ स्मार्ट पोलिसिंग हा उपक्रमही त्यांनी राबविला़. पुणे पोलीस दल अधिक अत्याधुनिक होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले़. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक गुन्हे शाखेतील सायबर लॅबचे काम पूर्ण झाले़. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष, २४ तास हेल्पलाईन सुविधा असे उपक्रम राबविण्यात आले़. ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या कामगिरीबद्दल दिल्ली येथील संस्थेकडून देशातील सर्वात नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्याचा गौरव करण्यात आला़.
बेकायदा कामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न
डॉ़. के. वेंकटेशम यांचा जन्म १० मे १९६२ रोजी हैदराबाद येथे झाला असून ते १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत़. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची नक्षलप्रभावित गोंदिया येथे नियुक्ती झाली होती़. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नक्षलवाद्याशी सामोरे जाण्यासाठी एक विस्तृत माहिती नेटवर्क विकसित केले़. त्यामुळे एका नक्षलवादी गटाच्या कमांडरला ते अटक करु शकले़. आदिवासींना नक्षलवादी बनवण्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी तेथे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले़. वैद्यकीय आणि व्यसनमुक्ती शिबिरे आयोजित केली़. त्यांनी मालेगाव आणि उस्मानाबाद या संवेदनशील ठिकाणी काम केले़ शैक्षणिक संस्थांमधील शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करण्याच्या विशेष कार्य दल प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे़. पोलीस उपायुक्त म्हणून मुंबईत काम करताना त्यांनी गुंडाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली़. २६/ ११ च्या घटनेच्या वेळी ते मुंबईतील दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते़. अतिरिक्त मुंबई महानगर (प्रशिक्षण व विशेष विभाग) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे़.
त्यांच्या कार्याचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान करण्यात आला़. ते राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते़. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी नोंदणी व इमिग्रेशनचे मुंबई विशेष शाखेत काम केले आहे़. गुप्तचर संस्थेचे उपसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे़.