कबड्डीला राजाश्रय मिळण्याची गरज : माने
By admin | Published: January 12, 2017 01:53 AM2017-01-12T01:53:07+5:302017-01-12T01:53:07+5:30
महाराष्ट्राची शान असणाऱ्या कबड्डी सारख्या मैदानी खेळास राजाश्रय मिळण्यासाठी निश्चित, शाश्वत प्रयत्न होणे आवश्यक आहे
इंदापूर : महाराष्ट्राची शान असणाऱ्या कबड्डी सारख्या मैदानी खेळास राजाश्रय मिळण्यासाठी निश्चित, शाश्वत प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी केले.
शिरसोडी येथे भरवण्यात आलेल्या स्व. विकास चषक भव्य खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्व.विकास पोळ व स्व.लखन शिंदे यांच्या द्वितीय स्मृतीदिना निमित्त शिरसोडी येथील साई कबड्डी क्लब,अशोक चोरमले मित्र परिवार व शिरसोडीच्या ग्रामस्थांनी स्पर्धा भरविली होती.
या स्पर्धेत छत्रपती कडलास या संघाने प्रथम क्रमांकाचे २१ हजार १ रुपयाचे पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक डोलेर्वाडीच्या सेव्हनस्टार संघाने मिळवला. तर मुंबईच्या मातृछाया संघाने तृतीय क्रमांक मिळवला. शरद झोळ, सिकंदर देशमुख, बापू घोगरे, शब्बीर पठाण, अशोक पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले. गुण लेखक म्हणून राघु शिंदे, शंकर चोरमले यांनी काम पाहिले. किसन शिंदे, रामभाऊ देवकर,सुरेश हाके, आप्पासाहेब चोरमले,मयुर गटकुळ,अशोक चोरमले, सोमनाथ ठवरे,अमीर शेख, प्रकाश शिंदे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. प्रो कबड्डी लीगमध्ये यु मुंबा संघातून खेळणारा ओंकार जाधव,महा कबड्डी लीगमध्ये मुंबई डेविल्स संघाकडून खेळणारा सुदेश कुळ्ये, पुणे पँथर्स संघाकडून खेळणारा नितीश मोरे,मुंबई डेवील्स संघाकडून खेळणारा संकेत सावंत, पुणे ग्रामीण पोलीस दलातील निलेश केमदाणे हे खेळाडु या स्पधेर्साठी आले होते.
मातृछाया मुंबई संघाचा स्वप्नील घाग, छत्रपती कडलस संघाचा ज्ञानेश्वर जाधव, इंदापूरच्या लखन पंडीत यांनी चमकदार खेळ केला. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे २१ हजार १ रुपयांचे पारितोषिक रोख सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने यांनी दिले. द्वितीय ११ हजार १ रुपयांचे पारितोषिक पिंपरी खुर्द शिरसोडीचे माजी सरपंच नानासाहेब नरुटे यांनी तर तृतीय ७००१ रुपयांचे पारितोषिक विशाल मारकड यांनी दिले होते.