समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांचे घर पाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:42 PM2019-01-24T13:42:13+5:302019-01-24T14:12:47+5:30

समाजमाध्यमांवर आपल्या सुरेल गाण्यांनी प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांचे घर पाडण्यात आले आहे.

kadubai khrats house demolish | समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांचे घर पाडले

समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या कडूबाई खरात यांचे घर पाडले

Next

- धनाजी कांबळे

पुणे : 'मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं... तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं...' अशा गीतांनी अवघा महाराष्ट्र जागवणाऱ्या भीमकन्या कडूबाई खरात यांचे पत्र्याचे घर सरकारने पाडले आहे. झाल्टा येथील गायरान जमिनीवर पत्र्याचे शेड टाकून राहणाऱ्या शेकडो कुटुंबांची घरे पाडण्यात आली आहेत. यातच कडूबाई खरात गेल्या दोन वर्षांपासून राहत होत्या.

औरंगाबादमधील चिखलठाणा येथे राहणा-या कडूबाई यांचं गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीलढ्याचं तत्वज्ञान त्यांच्या गोड गळ्यातून काळजाला हात घालणारे गाणे सर्वत्र पसरले. ते आज गावागावांत घुमू लागले आहे. कडूबाई यांनी एकतारीवर गायिलेल्या ‘मह्या भीमानं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी...’ या गाण्याला यू-ट्यूबवर लाखो लाईकस् आणि शेअरिंग मिळाले. मात्र, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न ना सरकारने सोडवला ना समाजाने. त्यामुळे आता बेघर झालेल्या कडूबाईंना दुसरीकडे एक पत्र्याची खोली भाड्याने घेऊन राहण्याची वेळ आली आहे.

दोन मुली आणि एका मुलासोबत अतिक्रमित जमिनीवर पत्र्याची झोपडी टाकून त्या राहत होत्या. वडिलांपासून घरात सुरु असलेलं गाणं कडूबाई यांच्या गोड गळ्यात आणखी खुललं आणि या गाण्यानंच कडूबाई यांच्या जगण्याला एक आकार दिला. कडूबाई अबला म्हणून नव्हे; तर एक स्वाभिमानी माणूस म्हणून जगू लागल्या. कष्टानं मिळालेली भाकरीच खाणार, अशी जिद्द घेऊन जगणा-या कडूबाई यांच्या आयुष्यात उजेड पेरणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा घरोघरी जागर व्हावा, या हेतूने कडूबाईंच्या हातातल्या एकतारीतूनच बाबासाहेबांच्या आंदोलनांचा अंगार शब्द झाला आणि सुरावटींनी तो गावोगावी घुमला आहे. आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये त्यांच्या आवाजातील गाणे असेल, पण सरकारने दडपशाही करून घर पडल्याने आता कडूबाई यांच्यासह शेकडो गरीब कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. काही लोक गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी फेऱ्या मारत आहेत. मात्र, गेल्या ४० वर्षांपासून येथे राहणाऱ्या कुटुंबाना पोलीस पिटाळून लावत आहेत, असे कडूबाई खरात यांच्यासह येथील रहिवाशांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

सरकारने कडूबाईंना घर द्यावे...
एकीकडे सरकार सगळ्यांना घरे देण्याची भाषा करीत असताना कडूबाई यांच्यासारख्या कलावंतांचीच परवड केली जात आहे. सरकारने लोककलावंत कडूबाई खरात यांच्या निवाऱ्याची सोय केली पाहिजे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे इतरही ज्या लोकांची पत्र्याची घरे पाडण्यात आली त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सरकारने सोडवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
 

Web Title: kadubai khrats house demolish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.