खेड तालुक्यातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ ; तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:15 PM2021-07-22T13:15:36+5:302021-07-22T13:15:43+5:30
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १.५ टी.एम.सी असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असून धरणातून आरळा नदीत तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आरळा नदीतून चासकमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपुड, परसूल, भोमाळे, घोटवडी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरण्यात मोठी मदत झाली आहे. पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे खालच्या भागात असलेल्या चासकमान धरणामधील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
चासकमानधरणातही १ टी.म.सी पाण्याची वाढ झाली असून, भामा आसखेड धरणही ५० टक्के भरले आहे. आराळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. दरवाजा विरहीत असलेल्या या धरणाच्या सांडव्यावरून सध्या प्रती सेकंद तीन हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी आरला नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १.५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे.
आरळा नदीत सोडलेल्या पाण्याचा चासकमान धरणात संचय होतो. तसेच गेल्या तीन दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे.