‘सिंहगड’वर कमळाचे वर्चस्व
By admin | Published: February 24, 2017 03:27 AM2017-02-24T03:27:58+5:302017-02-24T03:27:58+5:30
सिंहगड रस्त्यालगत असलेल्या जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग ३०), वडगाव धायरी-सनसिटी (प्रभाग ३३) आणि वडगाव
पुणे : सिंहगड रस्त्यालगत असलेल्या जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग ३०), वडगाव धायरी-सनसिटी (प्रभाग ३३) आणि वडगाव बुद्रुक- हिंगणे खुर्द (प्रभाग ३४) या तिन्ही प्रभागांत कमळाचे वर्चस्व राहिले. या प्रभागांतील १२ पैकी ११ जागांवर भाजपाने मुसंडी मारून राष्ट्रवादी काँग्रेसला छोबीपछाड दिले. एका जागेवर विजय मिळाल्याने किमान राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक्टिक् तरी सुरू राहिली.
स. प. महाविद्यालयामध्ये तिन्ही प्रभागांची मतमोजणी झाली. भाजपा व राष्ट्रवादीमध्येच थेट लढत झाली. सुरुवातीला प्रभाग ३०ची मतमोजणी करण्यात आली. या प्रभागात पहिल्या ३ फेऱ्यांत राष्ट्रवादीचे ३ उमेदवार आघाडीवर होते; मात्र चौथ्या फेरीत पूर्ण चित्रच पालटले. प्रिया गदादे वगळता राष्ट्रवादीचे इतर तिन्ही उमेदवारांना पराभव स्वीकाराला वागला. ३ जागांवर बाजी मारून भाजपाने वर्चस्व राखले. हे वर्चस्व पुढील दोन्ही प्रभागांत कायम राहिले. प्रभाग ३३मध्ये विकास दांगट व राजू लायगुडे यांच्यातील लढत वगळता हा प्रभाग भाजपाने एकहाती जिंकला. तर, प्रभाग ३४मध्ये भाजपाच्या लाटेसमोर राष्ट्रवादीचा एकही उमेदवार तग धरू शकला नाही. त्यांचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तिन्ही प्रभागांत १२पैकी ११ जागा जिंकून भाजपाने सिंहगड रस्त्यावर निर्विवाद वर्चस्व राखून राष्ट्रवादीला धूळ चारली. (प्रतिनिधी)
मोदी करिष्मा चालला
प्रभाग ३०, ३३ आणि ३४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालल्याचे भाजपाच्या विजयी उमेदवारांनी सांगितले. या विजयामध्ये स्थानिक नेत्यांच्या योगदानाबरोबरच विद्यमान नगरसेवकांनी केलेली कामे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शी कारभारालाही उमेदवारांनी श्रेय दिले. प्रभाग ३३ मधील राजू लायगुडे यांनी मोदी फॅक्टरमुळे अधिक मते मिळाल्याचे सांगितले. तसेच, प्रभागात केलेली कामे आणि इतर उमेदवारांची साथही महत्त्वाची ठरल्याचे ते म्हणाले.
याच प्रभागातील हरिदास चरवड व इतर उमेदवारांनीही मोदींच्या करिष्मयामुळे हे यश मिळाल्याचे स्पष्ट केले. प्रभाग ३० मधील शंकर पवार यांनीही मोदी करिष्मा मान्य केला. तर, प्रभाग ३४ मधील प्रसन्न जगताप यांनी विजयाचे श्रेय स्थानिक नेत्यांबरोबरच सर्व कार्यकर्त्यांना दिले.
काही अपवाद वगळता भाजपाच्या तिन्ही प्रभागांतील उमेदवारांना मिळालेल्या मतांत फारसा फरक दिसला नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपाला एकतर्फी साथ दिल्याचे दिसून आले.
३० प्रभाग
तिसरी फेरी निर्णायक
पुणे : जनता वसाहत-दत्तवाडीमध्ये पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी किमान ३ हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र, तिसऱ्या फेरीत भाजपाने मुसंडी मारून ही आघाडी खूप कमी केली. हीच फेरी त्यांना विजयासाठी निर्णायक ठरली आणि चौथ्या फेरीत त्यावर शिक्कामोर्तब केले. या प्रभागात केवळ प्रिया गदादे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकून राहिले. मनसेचे विद्यमान नगरसेवक राहुल तुपेरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. त्यामुळे उमेदवारांसह मतमोजणी केंद्राबाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीचे हे पॅनेल निवडूण येणार, अशी चर्चा जोर धरू लागली. सुरुवातीच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये जनता वसाहत भागातील केंद्रांची मतमोजणी करण्यात आली होती. त्यामुळे ही आघाडी मिळाली. या दोन फेऱ्यांत ब गटातून प्रिया गदादे यांनी सुमारे ८ हजार मतांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने आगेकूच केली. तर गट अ, ब आणि क मधील उमेदवार तीन हजार मतांनी आघाडीवर होते; पण तिसऱ्या फेरीची मोजणी सुरू झाल्यानंतर हळूहळू चित्र बदलू लागले. गट अ मध्ये भाजपाचे आनंद रिठे यांनी तिसऱ्या फेरीत चांगली मते खेचून आणून राष्ट्रवादीच्या अॅड. वैशाली चांदणे यांच्यावर सुमारे ४०० मतांची आघाडी घेतली. याच वेळी गट क मध्ये राष्ट्रवादीच्या अर्चना हनमघर यांनी भाजपाच्या अनिता कदम यांच्यावर तिसऱ्या फेरीतही सुमारे अडीच हजार मतांची आघाडी कायम ठेवली होती. तर, गट ड मध्ये भाजपाचे शंकर पवार व राष्ट्रवादीचे प्रेमराज गदादे यांच्यातील फरक केवळ ५०० मतांचा होता. चौथ्या फेरीची मोजणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण चित्रच पालटून गेले. जयदेवनगर, सूर्यनगरी या भागातील मतदारांनी भाजपाला कौल दिल्याने कदम यांच्यासह पवार व रिठे यांनी विजय खेचून आणला. रिठे यांना १३,०७६, तर पवार यांना १४,३६६ मते मिळाली. कदम व हनमघर यांच्या अटीतटीची लढत झाली. यामध्ये कदम यांनी १४,०२५ मते मिळवून ३५९ मतांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या प्रिया गदादे यांना या प्रभागात सर्वाधिक १८ हजार २८३ मते मिळाल्याने पुष्पमाला शिरवळकर यांचा सुमारे ४ हजार मतांनी पराभव झाला. या प्रभागात तब्बल ५ हजार २१६ मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरून सर्वच उमेदवारांना नाकारले. तर, ११ जणांनी टपालाद्वारे मतदान केले. त्यातील ६ मते बाद ठरली.
३३ प्रभाग
दांगट-लायगुडे लढत ठरली लक्षवेधी
पुणे : वडगाव धायरी-सनसिटी या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट व भाजपाचे राजू लायगुडे यांच्यातील लढत रंगतदार झाली. यामध्ये लायगुडे यांनी बाजी मारल्याने हा प्रभाग भाजपामय झाला. दांगट यांचा पराभव धक्कादायक ठरला. भाजपाचे हरिदास चरवड यांनी तब्बल १४ हजार मतांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अक्रूर कुदळे यांचा पराभव केला. प्रभागात गट अ, ब आणि कगटांत भाजपाच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. गट ड मध्ये मात्र दांगट व लायगुडे यांच्यातील लढत शेवटच्या फेरीपर्यंत रंगली. पहिल्या फेरीत भाजपाचे तीन उमेदवार आघाडीवर होते. तर, गट ड मध्ये दांगट यांना लायगुडे यांच्यापेक्षा सुमारे ७०० मते अधिक होती. ही आघाडी तिसऱ्या फेरीपर्यंत कमी-अधिक फरकाने कायम राहिली. तीन फेऱ्यांमध्ये दांगट यांचा वरचष्मा असलेल्या वडगाव भागातील केंद्रांचा समावेश होता. चौथ्या फेरीत लायगुडे यांच्या धायरी भागातील केंद्रांचा समावेश असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांना विजयाची आशा होती. त्यानुसार या फेरीत लायगुडे यांनी जवळपास पाच हजार मते मिळवून १६,१६४ पर्यंत मजल मारली. तर, दांगट यांना १४,४११ मतांवर समाधान मानावे लागले. गट अ मध्ये चरवड यांनी २१ हजार ५७८ मते घेऊन विजयी झाले. चरवड यांनी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीत आघाडी मिळविली होती. शेवटी त्यांनी निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे अक्रूर कुदळे यांना ६ हजार ९९६ मते मिळाली. गट ब मध्ये भाजपाच्या हेमा नवले १७ हजार ३९३ मतांनी विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या सुनीता चव्हाण यांना ११ हजार ५९८ मते मिळाली. गट क मध्ये भाजपाच्या नीता दांगट यांना १७ हजार १०९ मते, तर राष्ट्रवादीच्या स्वाती पोकळे यांना ८ हजार ३१० मते मिळाली. मनसेच्या विद्यमान नगरसेविका युगंधरा चाकणकर यांना केवळ ५ हजार २७५ मतांवर समाधान मानावे लागले. या प्रभागात एकूण ३ हजार ४६२ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. या प्रभागात ५१ मतदारांनी टपालाद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
३४ प्रभाग
पुणे : वडगाव बुद्रुक-हिंगणे खुर्द या प्रभागात भाजपाच्या सर्वच उमेदवारांनी निर्विवाद विजय संपादन केला असून, सर्व उमेदवारांना २० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. राष्ट्रवादीसह इतर सर्व पक्षांचे या प्रभागात पानिपत झाले.
विद्यमान नगरसेवक श्रीकांत जगताप, मंजूषा नागपुरे आणि काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी महापौर अॅड. प्रसन्न जगताप यांच्यामुळे हा प्रभाग भाजपासाठी सोपा मानला जात होता. त्यानुसार तिघांनीही अपेक्षित मते मिळवून ज्योती गोसावी या चौथ्या उमेदवारासह प्रभागावर वर्चस्व राखले. गट अ मध्ये अॅड. जगताप यांनी २० हजार ५११ मते मिळवून राष्ट्रवादीचे बाळासाहेब कापरे यांचा तब्बल १४ हजार मतांनी पराभव केला. गट ब मध्ये गोसावी यांना प्रभागात सर्वाधिक २२,२३० मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या जयश्री जगताप यांचा १५ हजार ६१७ मतांनी पराभव केला. या गटात शिवसेनेच्या पल्लवी पासलकर ३,७९३ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिल्या. क गटात नागपुरे यांनी २०,९१९ मते मिळाली. या गटात राष्ट्रवादीच्या माधुरी कडू यांच्यापेक्षा शिवसेनेच्या पौर्णिमा निंबाळकर यांना अधिक मते मिळाली. निंबाळकर यांना ५,५२८ तर कडू यांना ४,८५७ मते मिळाली आहेत. गट ड मध्ये जगताप यांनी २१,४१९ मते मिळवून विजय संपादन केला. राष्ट्रवादीचे शैलेश चरवड यांना केवळ ६,२९३ मते मिळाली.
प्रभागामध्ये भाजपाचे चारही उमेदवार पहिल्या फेरीपासून मोठ्या फरकाने आघाडीवर होते. ही आघाडी प्रत्येक फेरीत कायम राहिली. दुसऱ्या फेरीत घेतलेली आघाडीच विजयी ठरली. या फेरीनंतर पाचव्या फेरीपर्यंत इतर उमेदवारांना फारशी चमक दाखविता आली नाही. या प्रभागात २ हजार ६८६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडत उमेदवारांना नाकारले. तर
२३ मतदारांनी टपालाद्वारे मतदान केले.
फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि घोषणाबाजी करीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स. प. महाविद्यालयाच्या परिसरात जल्लोषात विजय साजरा केला. टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग ३०, ३३ आणि ३४ ची मतमोजणी स. प. महाविद्यालयात सकाळी १० वाजता कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली. मतमोजणीसाठी २० टेबल ठेवण्यात आले होते. बीप..बीप.. आवाज करीत एकेका मशिनमधून मतांचे आकडे बाहेर पडू लागले. हे आकडे टिपून घेण्यात सरकारी अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मग्न हाते. सुरुवातीला प्रभाग ३० मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याने भाजपाच्या गोटात शांतता पसरली. मात्र, तिसऱ्या फेरीनंतर चित्र बदलत गेले आणि ही शांतता राष्ट्रवादीच्या गोटात पसरली. तर, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. या वेळी प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. एक-एक निकाल बाहेर पडू लागल्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात भाजपाचा जयघोष सुरू झाला. रात्री आठपर्यंत हा जल्लोष सुरू होता. त्यामुळे परिसरात गुलालाचा खच पडला होता.