पुणे : दिवाळीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडे बंगल्यातील आऊटहाऊसमध्ये राहणाऱ्या कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरून ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मुकेश सिंग (वय ३०), त्याची पत्नी पारो (वय २३), केसर साई (वय ३०, सर्व रा़ शिवाजी गार्डनसमोर बोपोडी) व त्यांच्याकडे आलेला पाहुणा सुरेंद्र सिंंग यांच्यावर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आशिष भवरलाल जैन (वय ३९, रा़ कुंदन इस्टेट, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्यादरम्यान घडला़ आशिष जैन कॉन्ट्रॅक्टर असून मुकेश सिंग व त्यांची पत्नी त्यांच्याच बंगल्यात राहत होते़ ते मूळचे नेपाळमधील आहेत़ जैन कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते़ हे या लोकांना माहिती असल्याने त्यांनी संगनमत करून घराच्या वडिलांच्या रूमचे बंद खिडकीचे लॉक उचकटून त्याद्वारे घरात प्रवेश केला़ घरातील तीन बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील लॉकरचेही लॉक तोडले. कपाटातील मौल्यवान वस्तू, डायमंड, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बंगल्यावर सुरक्षारक्षक आहे़ त्याने या सर्वांना बॅगा भरून घेऊन जाताना पाहिले. जैन कुटुंब घरी आल्यानंतर घरफोडीचा हा प्रकार उघडकीस आला आहे़ सिंग व त्यांच्या साथीदारासह पळून गेला असून खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते अधिक तपास करीत आहेत.