पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा मंगलमय वातावरणात अतिशय जल्लोषात पुण्याचे पहिले मानाचे कसबा गणपती चांदीच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत. ढोलताशाच्या गजरात आज (दि.१९) गणरायांचे स्वागत करण्यात आले. वाजतगाजत विधीवत मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आले. सकाळी पहिला मानाचा कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशाच्या निनादात पालखीमध्ये गणरायाची मूर्ती ठेवून मिरवणूक रास्ता पेठेतून कसब्यातील मंडपात आली.
रास्ता पेठेतील मूर्तीकार अभिजित धोंडफळे यांच्या वास्तूमधून कसबा गणपतीची मुर्ती पालखीत विराजमान झाली होती. तिथून वाजतगाजत ही पालखी कसबा पेठेतून आणि तिथून मंडपामध्ये चांदीच्या सिंहासनावर बाप्पा विराजमान झाले . सकाळी ११.५० वाजता डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मिरवणुकीत सुरवातीला संघर्ष ढोल ताशा पथक, नंतर श्रीराम पथक, शौर्य ढोल ताशा पथक आणि प्रभात बॅंड आपली सेवा सादर केली. गणपत बाप्पा मोरयाच्या गजर करत गणरायाची थाटात मिरवणूक झाली आणि ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मानाचा पहिला गणपती विराजमान झाल्यानंतर इतर गणरायांची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात होणार आहे.