दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबर आता कात्रज डेअरीची 'बेकरी प्रोडक्ट'मध्येही एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 02:46 PM2021-12-31T14:46:26+5:302021-12-31T14:51:53+5:30
आता कात्रज डेअरी कुकीज हे नवीन उत्पादन घेऊन नवीन वर्षामध्ये मार्केटमध्ये उतरत आहे...
पुणे : ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतक-यांचा आधार असलेली पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) गेले अनेक वर्षे दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबरच आता "बेकरी" प्रोडक्टमध्ये देखील एन्ट्री केली आहे. क्रीम, अँगमार्क तूप, टेबल बटर, मलई पनीर, लो फॅट पनीर, सुगंधीत दूध, कपामधील दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, टेबलबटर, आईस्क्रीम, खवा, पेढा, आंबा बर्फी, मलई बर्फी, अंजीर बर्फी, कलाकंद, काजू कतली, बासुंदी, पाश्चराईज्ड क्रीमनंतर आता कात्रज डेअरी कुकीज हे नवीन उत्पादन घेऊन नवीन वर्षामध्ये मार्केटमध्ये उतरत असल्याची माहिती अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे पुणेकरांची सुपरिचित कात्रज डेअरी संघ. कात्रज या ॲडनेमने दुधाबरोबरच विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करत आहे. यामध्ये क्रीम, अँगमार्क तूप, टेबल बटर, मलई पनीर, लो फॅट पनीर, सुगंधीत दूध, कपामधील दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, टेबलबटर, आईस्क्रीम, खवा, पेढा, आंबा बर्फी, मलई बर्फी, अंजीर बर्फी, कलाकंद, काजू कतली, बासुंदी, पाश्चराईज्ड क्रीम यासारख्या स्वच्छ, दर्जेदार दुग्धजन्य पदार्थाचे वेगवेगळ्या पॅकसाईजमध्ये व स्वादामध्ये उत्पादन करत असून, ही सर्व उत्पादने चोखंदळ पुणेकरांचे पसंतीस उतरली आहेत. कात्रजच्या या सर्व उत्पादनांना पुणे, पिंपरी चिंचवड शहर व उपनगरांबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मोठी मागणी आहे. ही कात्रज डेअरी बरोबरच समस्त पुणेकर व जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी
अभिमानाची गोष्ट आहे. कात्रज डेअरीने आयएसओ २२०००:२०१८ व आयएसओ १४००१:२०१५ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मानांकने मिळविलेले आहेत. त्याबरोबरच एनडीडीबीचे गुणवत्ता व दर्जा बाबतचे क्वालिटी मार्क हे मानांकन देखील मिळविलेले आहे. खास चोखंदळ पुणेकरांसाठी नविन वर्षांच्या आगमन प्रसंगी कात्रज डेअरी कात्रज कुकीज बाजारात विक्रीसाठी आणत आहे. संघाचे जेष्ठ संचालक बाळासाहेब ढमढेरे यांचे शुभहस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत कात्रज कुकीज उत्पादन बाजारपेठेत लाँच करण्यात आले.
कात्रज कुकीज चॉकलेट चिप्स, चॉकलेट चंक्स, कॉफी ड्रायफ्रुटस, जिंजर ड्रायफ्रुटस या चार प्रकारात १७० ग्रॅम पॅकसाईज मध्ये उपलब्ध आहे. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, उपाध्यक्ष वैशाली गोपालघरे, संचालक भ रामचंद्र ठोंबरे, गोपाळराव म्हस्के, बाळासाहेब ढमढेरे, संदीप जगदाळे, बाळासाहेब खिलारी, दिलीप थोपटे, व्यवस्थापक संजय कालेकर व संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तरी ग्राहकांनी कात्रज कुकीज या नविन उत्पादनांची चव चाखावी असे नम्र आवाहन हिंगे यांनी केले.