कात्रज प्राणी संग्रहालयाची 'एंट्री फी' वाढणार, शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:42 AM2018-11-13T02:42:38+5:302018-11-13T02:43:24+5:30
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय : स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी केला सादर
पुणे : कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. प्रौढ व्यक्तींना सध्या २५ रुपयांचे प्रवेश शुल्क आकारले जाते त्यामध्ये वाढ करून ते ५० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बॅटरी आॅपरेटेड वाहनाचे शुल्क ४० वरून ५० रुपये करण्यात येणार आहे.
प्रौढ व्यक्तींच्या शुल्काव्यतिरिक्त इतर प्रवेश शुल्क जैसे थे ठेवण्यात आले आहे, त्यामध्ये वाढ केलेली नाही. ३ वर्षांखालील मुलांसाठी मोफत तर ४ फुटांपेक्षा कमी उंची असलेल्या मुलांना १० रुपये, विदेशी नागरिकांना १०० रुपये, अंध, अपंगांना मोफत, खासगी शाळांच्या मुलांना १० रुपये, पालिका शाळांच्या मुलांना ५ रुपये, स्टिल कॅमेरा फोटो शूटसाठी ५० रुपये, व्हिडिओ चित्रीकरणासाठी २००, गाईडसाठीचे ५० रुपयांचे शुल्क कायम ठेवण्यात आले आहे. कात्रज प्राणिसंग्रहालयातील प्राणी, त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा, उद्यान व्यवस्थापन, त्याची देखभाल दुरुस्ती यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्या तुलनेत उत्पन्न कमी आहे.
प्राणिसंग्रहालयाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू असून सिंह, शेकरू, रानमांजरे, रानकुत्री यांच्यासाठी खंदक, नवीन सर्पोद्यान, जलचर पक्ष्यांसाठी अद्ययावत पिंजरा निर्मिती, प्राणी प्रजनन केंद्र, निसर्ग माहिती केंद्राचे उर्वरित काम यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. त्यामुळे उद्यानाचे प्रवेश शुल्कात वाढ करणे आवश्यक असल्याची शिफारस महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील प्राणी संग्रहालय सल्लागार समितीने केली आहे, त्यानुसार हा प्रस्ताव स्थायीपुढे ठेवण्यात आला आहे. या उद्यानास दरवर्षी सुमारे ३ लाखांहून अधिक पर्यटक भेट देत असून त्यात प्रौढ व्यक्तींची संख्या ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. देशातील अन्य संग्रहालयांच्या तुलनेत कात्रज उद्यानाचे प्रवेश शुल्क अतिशय कमी असल्याचे उद्यान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.