मुळशीचे दोन टीएमसी पाणी पिण्यासाठी ठेवा : सुप्रिया सुळेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 07:56 PM2019-12-16T19:56:28+5:302019-12-16T20:03:14+5:30
खडकवासला-निरा खोऱ्यातील प्रश्नांवर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
पुणे : मुळशी तालुक्यातील नागरिकांना मुळशी धरणातील २ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे, मुठा उजवा कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करावे, गुंजवणी धरणग्रस्तांना घरांसाठी दिलेल्या जागा त्यांच्या नावावर करुन द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक खलिल अन्सारी यांच्याकडे केली.
बारामती लोकसभा मतदार संघातील जनाई शिरसाई, पुरंदर उपसा, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, मुळशी व टेमघर या धरण क्षेत्रातील विविध पाणी योजनांबाबत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सुळे यांनी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांची सिंचनभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय चोपडे, अधिक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, शिवाजीराव डुबल, राष्ट्रवादीचे माणिकराव झेंडे, रणजीत शिवतारे, सचिन दोडके, नाना भूरूक, आप्पासाहेब पवार उपस्थित होते.
टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात येत आहे. मात्र, या पाण्यावर अवलंबून असलेल्या काही गावांतील नागरिकांचे व शेतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी धरण रिकामे करताना प्रथम त्यांच्यासाठी पाण्याची सोय होणे आवश्यक आहे. मुळशी भागातील स्थानिक शेतकऱ्यांना पिण्यासाठी मुळशी धरणाचे दोन टीएमसी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सुळे यांनी केली.
खडकवासला जुन्या कालव्याच्या लाभ क्षेत्रापर्यंत नवीन मुठा उजवा कालवा वाढवावा, पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सणसर कालव्यातून सोडण्यात यावे. याशिवाय जनाई शिरसाई योजनेतून सध्या काही गावांना व तेथील शेतीला पाणी दिले जाते. त्यात आणखी काही गावे वाढवावीत, असे सुप्रिया सुळे यांनी सुचविले. जनाई शिरसाई कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करावे. अस्तरीकरण झाल्यास वाचणारे पाणी अनेक वंचित गावांना पुरवता येईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
--
कऱ्हा, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करा
कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांच्या बाजूचे भराव अनेक ठिकाणी वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी पडझड झाली आहे. येथे तातडीने दुरुस्ती करावी. तसेच, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
-----------