पुणे : पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासलाधरणातील पाणीसाठा ७३ टक्के इतका झाला आहे. आज दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारनंतर धरणातून मुठा नदीपात्रातून पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांचा एकूण पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे.आज गुरूवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ७३ टक्के (१.४४ टीएमसी ) झाला आहे. धरणाची क्षमता १.९७ टीएमसी आहे. पावसाचा जोर वाढल्यास दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा येवा पाहून त्यानंतर प्रथम कालव्यातून १४०० क्युसेक पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल नंतर नदीपात्रातून विसर्ग सुरू होईल असे खडकवासला धरणाचे तंत्र सहायक दत्तात्रय भागवत यांनी सांगितले.
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातील एकूण पाणीसाठा ४८.६४ टक्के झाला. गेल्या वर्षी सहा ऑगस्टला या धरणातील पाणीसाठा १००टक्के होता. गेल्या २४ तासात झालेला पाऊस धरणातील पाणीसाठा: खडकवासला: १८मिमी, १.७३ टीएमसी (७३%). पानशेत: ८२ मिमी, ५.८६ टीएमसी (५५.०८%).वरसगाव:८० मिमी, ५.७७ टीएमसी ( ४५%). टेमघर:८५ मिमी १.११ टीएमसी (२९.११%).