बारामती/काऱ्हाटी : काऱ्हाटी ता. बारामती येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या शेतजमिनीच्या हस्तांतरण प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत. शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी खडसे यांची भेट घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते त्यानुसार तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महादेव खंडाळे यांनी सांगितले. या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध शैक्षणिक सुविधा निर्माण करावा, असा उद्देश ग्रामस्थांचा होता. मात्र, संस्थेच्या ८१ एकर जागेपैकी ७३ एकर ७ गुंठे जागा अजित पवार विश्वस्त असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेकडे हस्तांतरीत केली. त्यांच्या नोंदीसाठी ग्रामस्थांनी विरोध केला. विभागीय आयुक्तांकडे अपिल केले. मात्र, त्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही. जागा विद्या प्रतिष्ठानला हस्तांतरीत करण्यात आली. या विरोधात १३ डिसेंबर रोजी गावच्या महादेव मंदीराच्या सभागृहात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांनी जागा परत मिळविण्याबरोबरच संस्थेचे अस्तित्व कायम ठेवण्याचा ठराव केला. त्याच बरोबर उच्च न्यायालयात जाण्याचा ठराव देखील केला आहे. तत्पूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे याबाबत त्यांनी दाद मागितली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशीचे आदेश खडसे यांनी दिले आहेत. याच अनुषंगाने काऱ्हाटी ग्रामस्थ कोणतीही परिस्थितीत जमिन मिळवण्यासाठी ४ जानेवारीला ‘ रास्ता रोको ’ अांदोलन करणार आहेत. कृषी उद्योग मुल शिक्षण संस्थेची स्थापना १९५२ साली डॉ. अच्युतराव आगरकर यांनी सुरू केली. या संस्थेला ८१ एकर जमिन आहे. या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनातून शिक्षकांचा पगार देवून ज्ञानाजर्नाचे काम करून या भागाचा कायापालट केला. घराघरातील एक तरी व्यक्ती शिक्षण घेवुन स्वत:च्या पायावर उभे राहु शकली. विद्या प्रतिष्ठान संस्थेने ७३ एकर जमिन हस्तांत्तरीत करून घेतली आहे. या पुर्वी झालेला हस्तांतरीचा ठराव आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. असे संस्थेचे उपाध्यक्ष वाबळे यांनी सांगितले.४विद्या प्रतिष्ठानने ताब्यात घेतलेली जमिन परत मिळावी या साठी ग्रामस्थ रविवारी (दि.४) बारामती मोरगाव रस्त्यावर ‘रस्ता रोको’ आंदोलन करणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद वाबळे यांच्यासह ग्रामस्थांनी ही माहिती दिली.
खडसेंनी दिले चौकशीचे आदेश
By admin | Published: January 03, 2015 11:00 PM