पुणे : राज्यातील खरिपाच्या १२९.४० लाख हेक्टरवरील (९१ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात असून, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, बाजरीच्या पेरणीला वेग आला आहे.१५ जूनपर्यंत सर्वदूर मान्सून व्यापला होता. त्यानंतर पावसाचा खंड पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रासह विविध ठिकाणी मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.
राज्यात ऊस वगळून १४१.९९ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १२९.४० लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवडीची कामे झाली आहेत. गेल्या वर्षी याच काळात ११५.७९ लाख हेक्टरवरील (८१.५४ टक्के) पेरणीची कामे पूर्ण झाली होती. यंदा ऊस पिकासह १३०.४४ लाख हेक्टरवरील पेरणी-लागवडीची कामे (८६ टक्के) उरकली आहेत. भात आणि नाचणीच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व मका पिके फुलोरा अवस्थेत असून, भात व बाजरी फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. तर, बागायती कापूस पाते धरण्याच्या अवस्थेत असून, पिकांमध्ये आंतर मशागतीची कामे सुरू आहेत.अतिवृष्टीमुळे दहा हजार हेक्टर क्षेत्र बाधितअतिवृष्टीमुळे जुलैअखेरपर्यंत बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यातील १० हजार ७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, हळद, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.