पुणे : वडगावशेरी येथील एकता भाटी यांच्या खूनप्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या महिलेने व्हॉट्सअॅप कॉलिंगवरून खुनाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
संध्या विनय पुरी (वय ३३, रा. डीडीए एसएफएस, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एकता यांचे पती ब्रिजेश भाटी यांनी चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. एकता भाटी यांची २१ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिवलाल ऊर्फ शिवाजी बाबुलाल राव आणि मुकेश ऊर्फ माँटी शिवलाल राव पितापुत्रांना घटनेच्या दिवशी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडे तपासात केला असता पुरी यांनी एकता भाटी यांची हत्या करण्यासाठी राव पितापुत्राला सुपारी दिली होती, असे कबूल केले.
सोमवारी पुरी यांना दिल्ली येथून अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. भाटी यांच्या हत्येसाठी किती रक्कम देण्यात आली, कोणत्या कारणासाठी हत्या करण्यास सांगण्यात आले?, कोठे कट रचला? अटक करण्यात आलेल्याव्यतिरिक्त अन्य कोण साथीदार आहेत? आदी तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी पुरी हिला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पुरी हिने व्हॉट्सअॅपद्वारे शिवाजी राव याला भाटी कुटुंबीयांचा फोटो पाठविला होता. तसेच, ब्रिजेश भाटी यांचा मुलगा आयान व मुलगी अहाना हे संस्कृती विद्यालय, वडगावशेरी येथे शिकत असल्याची माहिती व शाळेचे लोकेशन पुरी हिने राव याला सेंड केले होते.राव हा पुरी हिची बहीण टीना हिच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप व व्हिडीओ कॉल करीत. त्यानंतर पुरी हिच्याशी कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत, असे तपासातून समोर आले आहे. पुरी हिचे फिर्यादी यांच्यासोबत अनैतिक संबंध तसेच आर्थिक व्यवहार होते.त्या काही दिवसांपूर्वी भाटी यांच्या वडगावशेरीतील घरी येऊन गेल्या होत्या. तसेच फिर्यादी यांचे भाऊ पी्रतमोहन राजबीसिंग भाटी यांना फोन करून ब्रिजेश यांच्या खानदानाला मारून टाकण्याची धमकी दिली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.