हडपसर येथे किर्लोस्कर न्युमॅटिक कामगारांचे आंदोलन चिघळले, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 09:46 PM2018-09-29T21:46:57+5:302018-09-29T22:00:59+5:30
किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील १३१ कामगारांना बडतर्फ करण्यात आले आहे . त्यामुळे कंपनीच्या समोर या कामगारांनी गेले ४१ दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे.
हडपसर: हडपसर येथील किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीमधील १३१ कामगारांना काढण्यात आल्याने त्यांनी कंपनीसमोर गेले ४१ दिवसापासून आंदोलन सुरु आहे. मात्र, आंदोलन केल्यापासून कंपनीने कामगारांशी चर्चा केली नाही. त्यामुळे आज कामगारांनी आपल्या मुलाबाळासह आंदोलन करण्याचा पवित्र उचलला. कामगारांच्या परिवार देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी सामिल झालामुळे कंपनीच्या प्रवेशद्वारावर शनिवारी (दि.२९) मोठा पेच निर्माण झाला होता. त्यात कामगारांनी प्रवेशव्दारावर आंदोलन करुन आतील कामगारांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळे कंपनी प्रशासनाने पोलिसांनी पाचारण केले. पोलीस कारवाईत आंदोलकांवर लाठीचार्ज केला व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
युनियन केल्याने कामगारांना केले बडतर्फ
किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील किर्लोस्कर न्युमॅटिक कामगार संघटनेतील सर्वच्या सर्व म्हणजे १३१ कामगारांना बडतर्फ केले आहेत. त्यामुळे कंपनीच्या समोर या कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे. कामगार आयुक्त यांनी व्यवस्थापनाशी समोरासमोर समेट घडवून कामगारहिताचा योग्य तो निर्णय घेवून बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यास व्यवस्थापनाला परावृत्त करावे. अशी मागणी कामगारांनी केली आहे. जोपर्यत कामगारांना परत कामावर रुजू करुन घेत नाहीत. तो पर्यत हे आंदोलन क़रण्यात येईल. असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अभिजित आडागळे, उपाध्यक्ष लकन तांबे, जनरल सेक्रेटरी सचिन सुरवसे, जॉईन सेक्रेटरी अशोक गंजाळ, खजिनदार आंबादास चाकणे, सदस्य बिपीन कावळे, अजित देवकर यांनी दिला होता. कामगाराच्या नोकरीच्या हमीसाठी त्यांनी युनियन केल्याने कंपनीने हा निर्णय अचानक घेवून कमागारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण केला आहे. याबाबत या कामगारांनी कामगार आयुक्ताकडे निवेदन देवून कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची मागणी केली आहे.
त्यानंतर गेले ४१ दिवसात खासदार, काही नेते येवून गेले मात्र आंदोलन व कंपनी व्यवस्थापन यांच्या चर्चा झाली नाही. कोणताही तोडगा निघाला नाही. त्यावर आज कंपनीच्या तीनही प्रवेशव्दारांवर आंदोलन केले. तेथून कामगारांना बाहेर जाता येत नव्हते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांनी या आंदोलनकर्त्याशी चर्चा केली. मात्र आंदोलनकर्त्यानी आपल्या घोषणा तशाच चालू ठेवल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आला. काही आंदोलकांनी त्यास विरोध केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी लाठी चार्ज केला. काही आंदोलनकांनी तेथून जाणा-या कच-याच्या गाडीखाली झोपण्याचा प्ऱयत्न केला. त्यांनतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यानां ताब्यात घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना वेळप्रसंगी काहीही करावे लागते. मात्र लहान मुले हातात असलेल्या आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी संयमाने कारवाई करणे गरजेचे असताना काही पोलिस अधिका-यांना त्याचा विसर पडलेला आज दिसून आला. त्यांची आंदोलनकर्त्याशी वर्तणूक गुन्हेगारासारखी पाहण्यास मिळाली.
आंदोलन सुरु झाल्यावर प्रथम दैनिक लोकमतने वृत्त प्रसिध्द केले. त्यांनतर खासदारांसह अनेक नेते आले. आंदोलनावर तोडगा काढतो असे सांगितले. मात्र, काही तोडगा निघाला नाही. कंपनीने गेल्या ४१ दिवसात आदोलनकर्त्याशी चर्चाच केली नाही. त्यामुळे या आदोलनकर्त्याच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेते येवूनही काही तोडगा निघाला नाही.