पुणे : कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनेक जण कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये जात असतात. मात्र, यावर्षीही शहरातील महापालिकेची सर्व उद्याने बंदच राहणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
महापालिकेने नुकतीच २२ ऑक्टोबरपासून शहरातील सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे व मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली होती. परंतु, यात राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उद्यानांबाबत स्पष्टता नसल्याने, महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानामध्ये कोजागरी पौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यास परवानगी दिलेली नाही.
त्यामुळे उद्यानांमध्ये सध्या तरी केवळ चालणे, फिरणे, व्यायाम करणे, योगा कार्यक्रम यांनाच परवानगी आहे. दरम्यान, कोजागरी पौर्णिमेनिमित्त कोणत्याही संस्थेने अथवा व्यक्तीने महापालिकेकडे लेखी परवानगी मागितली नसल्याचे महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले आहे.