कोलकाता गणेशमूर्ती प्रथमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:08 AM2018-08-20T01:08:14+5:302018-08-20T01:08:38+5:30
मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची कारागिरांची लगबग
अकोले : अवघ्या थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल गणेशभक्तांना लागली आहे; पण यावर्षी नेहमीपेक्षा वेगळ्या रंगात, ढंगात आणि आकारात कोलकता मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दरवर्षी शाडू मातीच्या किंवा प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या साहाय्याने बनवलेल्या गणेशमूर्ती महाराष्ट्रात विक्रीसाठी उपलब्ध असतात; पण यावर्षी इंदापूर तालुक्यात बारामती रोडवर पिंपळे येथे कोलकता मातीच्या बनवलेल्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी तयार आहेत.
या मूर्तींचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) असल्याने यामुळे कोणतेही जलप्रदूषण होणार नाही. या मूर्ती तयार करण्यासाठी कोलकता माती, गव्हाचे काड, बांबूचे लाकूड, सुतळी आणि नैसर्गिक रंग आदींच्या साहाय्याने कलाकुसर करून वेगवेगळ्या रुपात गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या गणेशमूर्ती अनेक देवतांच्या रूपात म्हणजेच शंकर, गरुडरुपी पक्ष्यावर बसलेल्या आणि सिंहासनावर स्वार झालेल्या अशा दहा फुटांपर्यंत या गणेशमूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत.
याच मूर्ती रस्त्याने येणाऱ्या-जाणाºया लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याच कलाकुसरीसाठी खास चार महिन्यांपासून पश्चिम बंगालवरून आलेले कारागीर तापूस, मुंडोल, सोपून, विक्रम, दिवासिस यांनी गणेशमूर्ती बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
येथील शाडूच्या मूर्तीपेक्षा आम्ही मातीपासून बनवलेल्या मूर्ती टिकाऊ आणि मोठ्या आकाराच्या असल्यामुळे खूप दिवस बनवायला लागले. आम्ही या मूर्ती तयार करण्यासाठी कोणत्याही साचाचा उपयोग करीत नाही. केवळ हाताच्या साहाय्याने सुबक मूर्ती बनवण्याचे काम करीत असल्याने मूर्तींच्या किमती दोनशे रुपयांपासून पाच हजार रुपये असल्याचे कारागिरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावर्षी मात्र, कलकत्ता मातीच्या मूर्ती प्रथमच पुणे जिल्ह्याच्या बाजारात दाखल होणार असून इतर मूर्तींच्या तुलनेत या गणेशमूर्ती नक्कीच गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेणार, यात मात्र शंका नाही.
इंदापूरकरांनी दिली कलेला मनापासून दाद
४आता केवळ शेवटचा रंगाचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. यावेळी मुंडोल म्हणाले, की आमचा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय कोलकत्यात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील लोक पर्यटनासाठी आले असता त्यांनी आमची कला पाहून इंदापूर तालुक्यात गणेशमूर्ती बनवण्यासाठी येण्याची विनंती केली यासाठी त्यांनी पूर्ण सहकार्य केले.