कोरेगाव-भीमा हिंसाचार : कोणत्याही क्षणी मिलिंद एकबोटेंना होऊ शकते अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 06:22 PM2018-01-22T18:22:35+5:302018-01-22T18:30:41+5:30
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं कधीही त्यांना अटक होऊ शकते
पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं कधीही त्यांना अटक होऊ शकते. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली होती.
या दंगलीच्या मुख्य सूत्रधारांविरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असूनही सरकारने त्यांना अटक केलेली नाही. ही बाब लोकशाही व कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने घातक आहे. अटकेची मागणी घेऊन विविध 35 संघटनांनी गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करीत 18 जानेवारी रोजी या घटनेचा निषेध नोंदविला होता.
पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.
कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल
येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळेही दोन्ही समाजांमध्ये अधिक कटुता निर्माण झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. पाच जानेवारी रोजी त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला आहे.
भिडेंसह एकबोटेंना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही- दीपक केसरकर
कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले, ते सावंतवाडी येथे बोलत होते. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे सुरू असून, पोलीस दोषींवर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होतं .