पुणे : कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाल्यानंतर आता मराठवाड्यात खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जात असल्याचा गंभीर आरोप अन्न व नागरी पुरवठामंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पुरावे देखील सादर करण्यात आल्याचे सांगून मुळात कुणबी असणाऱ्यांना विरोध नाही. मात्र, अशा पद्धतीने खडाखोड करून प्रमाणपत्र मिळणाऱ्यांना ओबीसींमध्ये सामावून घेतले जाणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मी केवळ ओबीसींच्या हक्कासाठी लढतोय असेही त्यांनी स्पष्ट केले.
भुजबळ पुण्यात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम सुरू झाल्यानंतर निजामशाहीतील वंशावळी तपासून कुणबी नोंद असल्यास ते आपोआपच ओबीसी होत आहेत. त्यानंतर केवळ जातपडताळणी शिल्लक राहते. मात्र, मराठवाड्यात काही लोक पूर्वीच्या नोंदीमध्ये खाडाखोड करून पेनाने कुणबी मराठा अशी नोंद करत आहेत. अशा खडाखोड केलेल्या लोकांना प्रमाणपत्र मिळत आहेत. याबाबत ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याको अशा खाडाखोड झालेल्या नोंदी पुराव्यादाखल दिल्या आहेत. कुणबी असलेल्यांना असे प्रमाणपत्र नक्कीच द्यावे. मात्र, खाडाखोड केलेल्यांना ओबीसीमध्ये सामावून घेणार नाही असा पवित्रा भुजबळ यांनी यावेळी घेतला.
शिंदे समितीचे काम संपले
शिंदे समितीची नियुक्ती मुळात मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी झाली होती. मात्र, त्याचे लोन राज्यभर पसरले असून अन्य ठिकाणीदेखील कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे समितीची नियुक्ती केवळ मराठवाड्यासाठी असताना अन्य भागात कशासाठी तपासणी होते, हे अनाकलनीय असल्याचे भुजबळ म्हणाले. शिंदे समितीचे काम आता संपलेले आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करावी, याचा पुन:रुच्चार भुजबळ यांनी यावेळी केला.
सरसकट ओबीसींमध्ये नाहीच
ओबीसींनी सरसकट कुणबी ही मागणी मान्य केलेली नाही आणि करणारही नाही असे त्यांनी यावेळी ठासून सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा हे ओबीसी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ते कायद्यातही बसणार नाही. त्यासाठी त्यांना विशिष्ट आरक्षण दिल्यास त्याला पाठिंबा राहील असे त्यांनी स्पष्ट केले ओबीसीमधून आरक्षण दिल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचादेखील अवमान ठरू शकतो असेही त्यांनी सांगितले.
मी केवळ ओबीसींचा
भुजबळ यांच्यावर शनिवारी तसेच रविवारी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला यावेळी याबाबत ते म्हणाले माझ्यावर हल्ले तर सोडाच पोलिसांवर देखील हल्ले झाले तेव्हा सामान्य माणसाची किंवा आमदारांचे काय घेऊन बसला त पोलीस कारवाईसाठी हातावर झाले आहेत जखमी झाल्यावरही त्यांच्यावर कारवाई झाली त्यामुळे त्यांना विश्वास देणे सरकारचे काम आहे. मी कोणाचाही प्रचार करत नसून मी कोणाचाही विरोधक नसल्याचे सप्ष्ट करत भुजबळ यांनी मी केवळ ओबीसींच्या हक्कासाठी लढत असल्याचेही या वेळी स्पष्ट केले.
भुजबळ यांची गाडी फोडण्याचा इशारा
दरम्यान, छगन भुजबळ पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये आले असताना स्वराज्य संघटनेचे डॉ. धनंजय जाधव यांनी भुजबळ यांची गाडा फोडण्याचा इशारा दिला. ते भुजबळ यांच्या गाडीजवळ सुमारे अर्धा तास उपस्थित होते. राज्यातील सामाजिक वातावरण दुषित करू नका, मराठा ओबीसी वाद लावू नका आणि मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करू नका आणि आमच्या लेकराबाळांचा घास हिसकावू नाहीतर गाडी फुटू शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तायवाडे व भुजबळ यांनी जातींमध्ये वाद लावू नये, वातावरण चिघळू नये व सामाजिक तेढ निर्माण होवू नये म्हणून आम्ही कायदा हातात घेतला नाही. मराठा समाजाच्या विरोधात बोलणे थांबवले नाही तर आम्ही भुजबळ व मराठा विरोधी नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असेही ते म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी ओबीसी कार्यकर्ते व स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली.