कुरकुंभ-दौंड मार्गाची दुरवस्था; रोज अपघात, राष्ट्रीय महामार्ग असून अवस्था डोंगराळ रस्त्यासारखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:24 AM2017-10-19T02:24:50+5:302017-10-19T02:24:58+5:30
कुरकुंभला (ता. दौंड) जोडणारा राज्यमार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण मंडळास वर्ग करण्यात आल्याने याची जबाबदारी कोणाची, या प्रश्नावरून सध्या चांगलेच वादळ उठले आहे. त्याचा प्रत्यक्ष दुष्परिणाम मात्र प्रवाशांना होतो आहे.
कुरकुंभ : कुरकुंभला (ता. दौंड) जोडणारा राज्यमार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण मंडळास वर्ग करण्यात आल्याने याची जबाबदारी कोणाची, या प्रश्नावरून सध्या चांगलेच वादळ उठले आहे. त्याचा प्रत्यक्ष दुष्परिणाम मात्र प्रवाशांना होतो आहे. या रस्त्यावर रोजच दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्याचा आव आणताना दिसत आहे.
या मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे अवजड वाहने अपघातग्रस्त होत आहेत. दरम्यान, वाळूचा ट्रक हा खड्ड्यात टाकलेल्या मातीत अडकल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा पाहण्यास आला. मात्र याही त्रासातून फक्त कसेबसे निघून जाणे हाच एक पर्याय वाहनचालक व प्रवाशांना राहिला आहे. कारण निवेदन देऊन कागदांची पेटारे भरत बसण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त सवाल प्रत्येक जण करीत आहे.
राज्यमार्गाचा बदल होऊन राष्ट्रीय मार्गाची पदवी धारण केलेल्या दौंड-कुरकुंभ मार्गाची अवस्था एखाद्या आदिवासी भागातल्या डोंगराळ रस्त्यासारखी झाली आहे. मात्र तरीदेखील प्रशासन आपली प्रशंसा करण्यापलीकडे काहीच का करीत नाही? हा सवाल होत आहे. मात्र रोजच्या जीवनात गुरफटलेल्या या सामान्य माणसाला दाद मागून आश्वासनाच्या पलीकडे मिळणार तरी काय? म्हणून तसंच फरफटत का होईना मार्गाचा वापर करणे बंधनकारक झाले आहे.
दौंड-कुरकुंभदरम्यान कुठलाच भाग असा राहिला नाही, ज्यावरून वाहन व्यवस्थित चालवले जाऊ शकते. १0 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तासाच्यावर वेळ जातो. कुरकुंभ घाटात तर याची दुर्दशा काही जास्तच आहे. प्रत्येक अवघड वळणावर रस्ता इतका खराब आहे, की अवजड वाहन वरच्या दिशेला जाताना माघारी फिरते की काय, अशी भीती मागील वाहनचालकाला वाटत असते.
सोशल मीडियावरही चर्चा
कुरकुंभ-दौंड रस्त्याची इतकी दुर्दशा झाली आहे, की याची चर्चा सोशल मीडियावरदेखील विविध विनोदी पद्धतीने केली जाऊ लागली आहे. दौंडला जाण्यासाठी कुणी रस्ता देता का रस्ता अशा प्रकारे भीक मागून दौंड तालुक्यातील नेत्यांना टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे दौंड कुरकुंभ रस्त्याची चर्चा ही प्रत्येकाच्या जणू रोजच्या चर्चेचा विषय बनला आहे.
उद्घाटनाची औपचारिकता झाली; कामाला सुरुवात कधी?
दौंड - कुरकुंभ रस्ता हा मनमाड-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला. त्याच्या उद्घाटनाची औपचारिकतादेखील झाली; मात्र प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, या वादात सामान्य माणसाची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तालुकास्तरीय नेतृत्वानेदेखील याची दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.