पुणे : मागील दहा महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक लोकांमध्ये पूर्वीचीच प्रतिकारशक्ती आहे. लहान मुलांना धोका कमी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकालाच लस घ्यावी लागणार नाही. मात्र, भविष्यात रुग्ण किती आढळतात आणि सिरो सर्व्हेमध्ये किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर येते, यानुसार लसीकरणाचे नियोजन करावे लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
फायझर कंपनीच्या माजी उपाध्यक्षांनी कोरोनाची साथ ओसरत असल्याचे सांगून आता लसींची गरज नसल्याचा दावा केला आहे. तसेच ‘आयसीएमआर’नेही देशातील प्रत्येकाला लस लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याविषयी जनआरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके म्हणाले, लस कधी येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तोपर्यंत अनेक लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. काही अभ्यास व तज्ज्ञांच्या मतानुसार ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल. देशात सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, अन्य आजार असलेला असा क्रम ठरलेला आहे. इतरांपर्यंत लस पोहोचेपर्यंत आपण हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल केलेली असेल. त्यामुळे १०० टक्के लोकांना लस द्यावी लागणार नाही. लस किती लोकसंख्येला द्यायची हे त्यावेळी होणारे सिरो सर्व्हे व रुग्णसंख्येनुसार नियोजन करावे लागेल, असे फडके यांनी स्पष्ट केले.
-----------
लसीची गरज हा वादाचा मुद्दा
आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनीही लस येईपर्यंत अनेकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल, असे सांगितले. लसीची गरज हा वैज्ञानिकांमधील वादाचा मुद्दा आहे. सध्या किती लोकांमध्ये प्रतिकारशक्ती आहे, हे नक्की माहिती नाही. पण सध्या विविध अभ्यासानुसार ३० ते ३५ टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाला लस घ्यावी लागणार नाही, असे आवटे यांनीही नमूद केले.
-----------