लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : चासकमान कालव्याच्या पोटकालवा प्रकल्पासाठी भूसंपादन केलेले क्षेत्र वगळून त्यालगत असलेल्या अन्य मालकीच्या क्षेत्रातून पोटकालवा खोदण्यात आल्याचा अजब प्रकार मांजरेवाडी-वाजेवाडी (ता. शिरूर) येथे उघड झाला आहे. त्यामुळे संबंधित तत्कालीन प्रकल्प पदाधिकाºयांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याविरोधात प्रकल्पबाधित सरस्वती ठकसेन मांजरे या शेतकरी गेल्या २० वर्षांपासून शासनदरबारी स्वत:वर झालेल्या अन्यायाची दाद मागत आहे. परंतु, शासनाकडून संबंधित महिलेला उडवाउडवीची उत्तरे व अपमानास्पद वागणूक सोडून काहीही ठोस उपाय मिळत नाही.चासकमान धरणातील पाणी वितरित करण्याच्या उद्देशाने २२ वर्षांपूर्वी डाव्या कालव्याचे खोदकाम करण्यात आले आहे. खेड तालुक्याच्या अंतिम साबळेवाडी हद्दीतून शिरूर तालुक्यात प्रवेश करणाºया कालव्याला मांजरेवाडी येथे उपकालवा खोदण्यात आला आहे. प्रत्यक्षात ज्या ठिकाणांहून उपकालव्याचे खोदकाम केले आहे, त्या ठिकाणी मांजरे यांची ३० गुंठे जागा प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आली आहे. चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गाला छेदून गेलेल्या कालव्यामार्फत पुढील चार ते पाच गावांसाठी पाणी वितरित केले जाते.मात्र, साबळेवाडी गावाच्या बाजूला पाणी वितरित करण्यासाठी खोदण्यात आलेला कालवा कायदेशीर कागदोपत्री भूसंपादन केलेल्या गट क्र. ३४२, ३४३ ऐवजी त्यालगत असलेल्या सरस्वती मांजरे यांच्या गट क्र. ३४१ मधून खोदण्यात आला आहे.विशेष म्हणजे, शासनाकडून प्रकल्प बाधित महिलेला या जागेची कुठलीही नुकसानभरपाईदेखील देण्यात आली नाही. याविरोधात महिला शेतकरी अगदी अन्यायाच्या पहिल्या दिवसापासून अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे शाखा आदींकडे रीतसरकागदपत्रांची पूर्तता करून दादमागत आहे; परंतु पाटबंधारे विभागाकडून या प्रश्नाविषयी ठोस उपाय योजिले जात नसल्याची सत्यस्थिती आहे.कालवा वाद्याच्या भोवºयातमांजरेवाडी (ता. शिरूर) हद्दीतून वाजेवाडी, साबळेवाडी, सिद्धेगव्हाण व बहुळ या चार गावांमध्ये पाणी वितरित करण्यासाठी पोटकालवा आहे. या कालव्यामार्फत परिसरातील शेती सिंचनाला पाणी वितरित केले जाते. साबळेवाडी हद्दीतून बहुळ, सिद्धेगव्हाण, अंबिका माता परिसरातील शेतीला पाणी वितरित करण्यासाठी खोदलेला पोटकालवा वादाच्या भोवºयात आहे. आवर्तनाचे पाणी या पोटकालव्यातून वितरित करताना कायम वाद उद्भवत आहे.पाटबंधारे विभागाने आमच्यावर झालेल्या अन्यायाचे तत्काळ निरसन करावे. भूसंपादन झालेल्या क्षेत्रातून कालवा खोदून आमची जमीन पूर्ववत करून द्यावी. शासनदरबारी वारंवार माराव्या लागणाºया फेºयांना कंटाळलो असून, त्यापुढे पोटकालव्यातून पाणी वितरित करू देणार नाही. तत्कालीन अधिकाºयांची चौकशी करावी.- सरस्वती मांजरे, प्रकल्प बाधित महिला शेतकरीसंबंधित प्रकल्पबाधित महिला शेतकरी मांजरे यांचे आमच्याकडे निवेदन आले आहे. शिक्रापूर डिव्हिजनला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. - गौतम लोंढे, कार्यकारी अभियंता, चासकमान प्रकल्प
भूसंपादन एकीकडे, कालवा खोदला दुसरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 3:43 AM