पुणे : पुण्यातील नामांकित एसपीज बिर्याणी हाऊसच्या जेवणात अळी आढळल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. आज दुपारी जेवणासाठी गेलेल्या एका ग्राहकाच्या जेवणात ही अळी आढळली. याप्रकरणी ग्राहकाने हाॅटेल प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांना उद्घटपणे उत्तरे देण्यात आली. तसेच काय करायचे ते करा असे सांगण्यात आले.
पुण्यातील सदाशिव पेठेत एसपीज बिर्याणी हाऊस हे फेमस हाॅटेल आहे. दरराेज पुणेकरांची येथे माेठी गर्दी असते. आज दुपारी 12 च्या सुमारास विरेंद्रसिंग ठाकूर हे त्यांच्या मुलासाेबत या हाॅटेलमध्ये जेवणासाठी गेले हाेते. जेवत असताना त्यांच्या मुलाच्या जेवणात अळी आढळून आली. याबाबत त्यांनी हाॅटेल प्रशासनाला जाब विचारला. त्यावर हाॅटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाेबत दमदाटी केली. तसेच जे काही करायचे ते करा असेही ठाकूर यांना सांगण्यात आले. ठाकूर यांनी आपल्या माेबाईलवर अळी सापडल्याचे चित्रिकरण करत हाेते. त्यावर हाॅटेलमधील एका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या माेबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच पाेलिसांकडे किंवा काेणाकडे जायचे तिकडे जा असेही ताे ठाकूर यांना म्हणाला.
या घटनेबाबत बाेलताना ठाकूर म्हणाले, आज मी आणि माझा मुलगा एसपीज बिर्याणी हाऊस येथे दुपारी 12 वाजता जेवणास गेलाे हाेताे. यावेळी जेवत असताना मुलाच्या जेवणात अळी आढळली. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी उर्मटपणे वर्तन केले. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे तेथील एक कर्मचारी म्हणाला. ग्राहक हा पैसे माेजून जेवत असताे. त्याला चांगल्या दर्जाचे अन्न मिळणे हा त्याचा हक्क आहे. जेवणात अळी निघने हा निष्काळजीपणा आहे.
दरम्यान याबाबत आम्ही एसपीज बिर्याणीच्या फाेन नंबरवर संपर्क केला असता समाेरुन कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नाही.