- अशोक खरात खोडद : आपल्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि वैभवशाली काळातील आपले साथीदार म्हणून आपले गडकोट, किल्ले ओळखले जात आहेत. खोडदजवळील किल्ले नारायणगडावर असलेल्या प्राचीन वास्तूंचे अवशेष अखेरचा श्वास घेत आहेत. शासनाकडून या किल्ले नारायणगडावर असणाऱ्या प्राचीन वास्तूंच्या अवशेषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी मागणी दुर्गप्रेमी आणि पर्यटकांकडून होत आहे, वेळीच जर या किल्ल्यांचे जतन केले नाही, तर या किल्ल्यांकडे भविष्यात केवळ एक डोंगर म्हणूनच पाहिले जाईल.नारायणगडावरील राजवाड्याच्या प्रवेशद्वाराचे दगडी खांब, शरभशिल्प, अंघोळीचे प्राचीन भांडे भग्न होत चालले आहेत. गणेशपट्टी आणि इतर अन्य प्राचीन दगडी वास्तू अखेरचा श्वास घेत आहेत. वेळीच या प्राचीन दगडी वस्तूंची डागडुजी केली नाही तर किल्ल्याची खरी ओळख असणाऱ्या या सर्व वास्तू काळाच्या ओघात लोप पावतील, अशी भीती निर्माण झाली आहे.किल्ले नारायणगडावर दुर्गप्रेमी-निसर्गमित्र व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून संवर्धनाचे कार्य सुरू आहे. या गडावर गेल्यानंतर समोरच डाव्या बाजूला गाडलेल्या अवस्थेत पाण्याचे एक टाके होते. या ग्रुपच्या माध्यमातून या टाक्यातील माती बाहेर काढून टाके मोकळे केले आहे. सध्या या टाक्यात वर्षभर पुरेलएवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गडाचीवाडी, खोडद, हिवरे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व युवक या संवर्धन मोहिमेत सक्रिय आहेत.किल्ले नारायणगडाला आजवर अनेक अभ्यासकांनी भेटी दिल्या आहेत. पेशवेकालीन म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पेशवेकालीन नसून पेशवेकाळाच्या आधीपासूनच हा किल्ला अस्तित्वात असल्याचे अनेक अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे. या किल्ल्यावरील असणाºया पाण्याच्या टाक्या हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याच्या पुरावा आहे, असे अनेक अभ्यासकांनी सांगितले आहे.किल्ल्यावरील उत्तरेच्या बाजूला असलेला आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला चोरदिंडी दरवाजादेखील अखेरच्या घटका मोजत आहे,हा चोरदिंडी दरवाजा कोणत्याहीक्षणी कोसळला जाऊ शकतो. किल्ल्यावरील अनेक बुरुजव तट ठिकठिकाणी कोसळलेगेले आहेत.>प्रवेशद्वार कोसळले; शरभशिल्पही तुटलेकिल्ल्यावरील राजवाड्याचे दगडी प्रवेशद्वार काही वर्षांपूर्वी सुस्थितीत होते. अलीकडच्या काळात हे प्रवेशद्वार खाली कोसळले आहे. या प्रवेशद्वाराचा दगडी खांब तुटला आहे. प्रवेशद्वाराचे एका बाजूकडचे शरभशिल्प तुटले आहे.प्राचीन काळातील अंघोळीचे दगडी भांडेदेखील तुटले आहे. प्रवेशद्वारावर असलेली गणेशपट्टीदेखील खाली कोसळली असून ती नामशेष होण्याची भीती आहे.
किल्ले नारायणगडावरील अवशेष घेताहेत अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 1:31 AM