शेवटी काय तर...३ कोटी खर्च करुन नेहरु स्टेडियममध्ये प्रकाश पडलाच नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 09:16 PM2018-07-02T21:16:40+5:302018-07-02T21:22:08+5:30
पुणेकरांना रात्र-दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी येथे विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला काम दिले. मात्र...
पुणे: स्वारगेट येथील पंडित नेहरु स्टेडियममध्ये रात्रंदिवस सामने खेळण्यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून खास विद्युत यंत्रणा बसविण्यात आली. परंतु, ही यंत्रणा बसविताना तांत्रिकदृष्ट्या चूक झाल्याने गेल्या दोन वर्षांत या विद्युत रोषणाईचा प्रकाशच पडला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळी विद्युत रोषणाईची यंत्रणा बसवून देखील रात्रीचा एकही सामना झालेल्या नाही.
महापालिकेच्या वतीने शहरामध्ये नेहरु स्टेडियम हे एकमेव क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले आहे. यात २५ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये अनेक महत्वाचे एकदिवसीय सामने खेळण्यात आले. परंतु, आयसीसीने स्टेडियमच्या नियमावलीत काही बदल केल्याने स्टेडियममध्ये ५ नोव्हेंबर २००५ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामना खेळविण्यात आला.
शहरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी व इतर अनेक लहान-मोठे राज्यस्तरीय, महाविद्यालयांचे क्रिकेट सामने खेळण्यासाठी या स्टेडियमला पसंती दिली जाते. पुणेकरांना रात्र-दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी येथे विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला काम दिले. मात्र, कंपनीने विदयुत रोषणाईचे काम करत असताना चुकीच्या पध्दतीने खांब लावल्यामुळे स्टेडियमवर अंधार पडत आहे. त्याचबरोबर खेळाडूंचा चेहयावर सुध्दा लाईट येत असल्यामुळे येथे सामना खेळता येत नाही.
याविषयी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे म्हणाले, स्टेडियमचे विद्युत रोषणाईचे काम सुरु असताना कामावर आक्षेप घेण्यात आला होता. यावेळी प्रशासनाला यासंदर्भात पत्र व्यवहार करुन चुकीच्या पध्दतीने काम होत असल्याची तक्रार केली होती. यामधील एक खांब चुकीच्या पध्दतीने लावल्यामुळे स्टेडियमवर अंधार पडत आहे. त्यामुळे विदयुत रोषणाई करुन सुध्दा स्टेडियमध्ये अंधारच असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------
स्टेडियमचे विद्युत रोषणाईचे काम करत असतान एका खांबाची स्थान चुकले आहे. त्यामुळे संपुर्ण स्टेडियमवर रोषणाई पडत नाही. आम्ही यासंदर्भात ठेकेदाराबरोबर चर्चा केली असून खांबाची जागा बदलण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता विद्युत विभाग