पुणे : राष्ट्रीय मान्सून मिशन अंतर्गत देशात प्रत्येक १२ कि.मी. परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हा व काही तालुका स्तरावर ही यंत्रणा आहे. पुढील वर्षीपासून प्रत्येक गटाचा अंदाज वर्तविला जाईल, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये (आयआयटीएम) कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘प्रत्युष’ या उच्च क्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरच्या लोकार्पणप्रसंगी ते ही देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. ‘एचपीसी’ प्रणालींतर्गत आतापर्यंत भारतात सुपर कॉम्प्युटरची क्षमता १ पेटाफ्लॉपपर्यंत होती. ‘आयआयटीएम’तील कॉम्प्युटरची क्षमता ४ पेटाफ्लॉप असून नोएडा येथील संस्थेत पुढील आठवड्यात २.८ पेटाफ्लॉप क्षमतेचा संगणक विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे हवामानाच्या क्षेत्रातील संशोधनाचा वेग वाढणार आहे. या क्षेत्रात भारत चौथ्या स्थानी पोहोचणार आहे.हवामान, त्सुनामी, वादळ, भूकंप यांसह विविध नैसर्गिक आपत्तींचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. या संगणकासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्याबाबत अधिक अचूकता येणार आहे. सध्या देशभरातील २ कोटी ४० लाख शेतकºयांपर्यंत हवामानविषयक माहिती थेट मोबाइलवर दिली जात आहे. २०१९ पर्यंत ४ कोटी ५० लाख शेतकºयांपर्यंत माहिती पोहचण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.खा. अनिल शिरोळे, केंद्रीय भू विज्ञान विभागाचे सचिव एम. राजीवन, सह सचिव डॉ. विपिन चंद्र, ‘आयआयटीएम’चे संचालक प्रा. रवी एस. नंजुनदिहा, हाय परफॉर्मन्स काम्प्युटिंगचे (एचपीसी) प्रकल्प संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव उपस्थित होते.
‘प्रत्युष’ सुपर कॉम्प्यूटरचे लोकार्पण; पुढील वर्षापासून गटस्तरीय हवामान अंदाज - हर्ष वर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:36 AM