निमगाव केतकी : ‘‘गेल्या अडीच वर्षात इंदापूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कार्यक्षम व सक्षम नेतृत्व नसल्यानेच तालुक्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे,’’ अशी टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.निमगाव केतकी येथे आयोजित इंदापूर तालुका काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा व चर्चासत्रात पाटील बोलत होते. या वेळी ‘कार्यकर्ता कसा असावा’ याविषयी करमाळ्याचे ज्येष्ठ विधिज्ञ बाबूराव हिरडे यांचे, तर ‘कार्यकर्त्याची जबाबदारी’ या विषयावर शशांक मोहिते यांनी संवाद साधला. पाटील पुढे म्हणाले, की आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना गाड्यांचा ताफा किंवा जेवणावळीवर अजिबात खर्च करायचा नाही. ही प्रथा तालुक्यातून हद्दपार करावी. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी स्वत: जबाबदारी घेऊन समाजातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तळागाळापर्यंत काम करावे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यापुढे पक्षात थारा दिला जाणार नाही. तालुक्याचे आपल्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. अवैध व्यवसायातून मिळणारा दोन नंबरचा पैसा व गुंडागर्दी या दोन प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्याने लक्ष दिले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.या वेळी इंदापूर पंचायत समिती सभापती विलासराव वाघमोडे, उपसभापती नारायण वीर, नीरा भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, मयूरसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव, श्रीमंत ढोले, वसंत मोहोळकर, मच्छिंद्र चांदणे, रमेश जाधव, निमगाव केतकीच्या सरपंच छाया मिसाळ, उपसरपंच तुषार जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, शेखर पाटील यांसह तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांनी केले. (वार्ताहर)
इंदापुरात कायदा व सुव्यवस्था बिघडली : हर्षवर्धन पाटील
By admin | Published: January 24, 2017 1:38 AM