पुणे : बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्याने पैसे दिले नाही म्हणून त्या वकिलाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन कळविले. पोलिसांनी तातडीने तो ट्रक पकडला व पोलीस ठाण्यात आणला. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाकडे चौकशी केल्यावर या वकिलानेच त्याच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून त्यापैकी १० हजार रुपये घेतल्याचे उघड झाले. तेव्हा पोलिसांनी वकिलावर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून बेकायदा वाळू वाहतूक केल्या प्रकरणी ट्रकचालकावरही गुन्हा दाखल केला आहे.
अॅड़ मुकेश शहारे (अध्यक्ष, पुणे शहर वाहतूक आघाडी) असे या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक संजय रवींद्र मोहिते (वय २४, रा़ निरा नरसिंहपूर, ता़ इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार विश्रांतवाडी येथील मच्छी मार्केटच्या पुढे बनाना लिफ हॉटेलसमोर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. संजय मोहिते हे अवैध वाळूचा ट्रक घेऊन जात असताना पुणे शहर वाहतूक आघाडीचा अध्यक्ष अॅड मुकेश शहारे यांनी ट्रक अडविला. ट्रक सोडून देण्यासाठी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली़. पैसे दिले नाहीत तर पोलिसांना बोलविण्याची धमकी दिली़. ट्रकचालकाने पैसे दिले नाही म्हणून अॅड़ शहारे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या या ट्रकची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर बीट मार्शलनी तातडीने ट्रक पकडून तो विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आणला. तेथे बाहेर वाळू खरेदी करणाऱ्यांकडून अॅड शहारे यांनी १० हजार रुपयांची खंडणी घेऊन ते निघून गेले.
पोलिसांनी ट्रकचालक संजय मोहिते यांच्याकडे चौकशी केल्यावर खंडणीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अॅड शहारे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाळू वाहतूकीची कोणतीही पावती नसताना अथव अन्य कागदपत्रे नसताना ३ ब्रास वाळू वाहतूक करताना मिळून आल्याने संजय मोहिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.