‘बे दुणे चार’ शिकताना ऑनलाइन क्लासमध्ये लागतो पॉर्न व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:15 AM2021-08-24T04:15:17+5:302021-08-24T04:15:17+5:30
स्टार डमी १०८६ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या दीड वर्षांपासून मुले ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवत असले असले तरी ...
स्टार डमी १०८६
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दीड वर्षांपासून मुले ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवत असले असले तरी हे शिक्षण पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चालू ऑनलाइन क्लासमध्ये लक्ष देण्यापेक्षा मुले व्हिडिओ गेम्स खेळण्यातच अधिक रमत आहेत. यातच क्लासमध्ये मुलांकडून आवाज म्यूट करणे, कॅॅमेरा बंद करून निघून जाणे हे प्रकार एकीकडे घडत आहेत. दुसरीकडे फुकटच्या ॲॅप्सचा वापर करून अश्लील ‘कमेंट’ करणे, अश्लील आवाज काढणे, शेरेबाजी करणे अशा गोष्टीही घडू लागल्या आहेत. हे कमी की काय म्हणून ऑनलाईन वर्ग चालू असतानाच ‘पॉर्न’ व्हिडिओ क्लासमध्ये व्हायरल झाल्याने पालक, शिक्षक आणि शाळांची चांगलीच झोप उडाली आहे.
त्यामुळे ऑनलाइन शिक्षण आता बास करा! त्यासाठी एकतर शाळा सुरू करा किंवा वेगळे पर्याय निवडा अशी मागणी पालकांमध्ये जोर धरू लागली आहे. सध्याच्या ‘टेक्नॉसॅव्ही’ युगात मुले अधिकच ‘स्मार्ट’ झाल्याने कितीही पासवर्ड ठेवले किंवा ॲॅप्स बंद केली तरी मुलांना हवे ते पाहण्याचे तंत्र अवगत असल्याचे अनेक पालकांचे निरीक्षण आहे. चोवीस तास मुलांवर नजर ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे पॉर्नोग्राफीपासून मुलांना कसे लांब ठेवायचे याची चिंता पालकांना आहे.
चौकट
“चालू ऑनलाइन क्लासमध्ये अचानक कोणीतरी मीटिंगचा ॲक्सेस घेतो आणि पॉर्न क्लिप सुरु करतो. असे प्रकार क्लासमध्ये घडू लागले आहेत. अचानकपणे ही कृती घडल्यावर इतर विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकही गोंधळून जातात. त्यामुळे ऑनलाइन क्लासमध्ये शाळा आणि शिक्षकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. क्लासची लिंक संबंधित विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणाला मिळणार नाही याची काळजी घ्यावी. जर चालू क्लासमध्ये कोणी अनोळखी चेहरा दिसला तर त्याला त्वरित बाहेर काढावे. असा काही प्रकार घडल्यास पालकांनी त्वरित संबंधित शाळेशी किंवा शिक्षकांशी संपर्क साधावा. शक्य असल्यास सायबर पोलीस किंवा तज्ज्ञांची मदत घ्यावी.”
-ओंकार गंधे, सायबर सुरक्षातज्ज्ञ
चौकट
ऑनलाइन क्लासमध्ये घेण्याची काळजी
* ऑनलाइन क्लाससाठी वापरात येणारे सॉफ्टवेअर हे कोणतेही असेल तरी चालते, परंतु त्यातील जर ‘पेड व्हर्शन’ घेतले तर त्यात अधिक चांगली सुरक्षा मिळते.
* ऑनलाइन क्लास सुरू करण्याआधी मीटिंग / क्लासची लिंक योग्य त्या संबंधित व्यक्तींनाच पाठवावी.
* शक्य असल्यास मीटिंगला पासवर्ड टाकावा.
* काही ‘पेड सॉफ्टवेअर’मध्ये आधी प्रत्येक व्यक्तीकडून फॉर्म भरून घेतला जातो आणि मगच लिंक सेंड होते. त्यामुळे मीटिंगमध्ये किंवा क्लासमध्ये कोण आले होते त्याची यादी मिळते.
* क्लासमध्ये थेट प्रवेश देऊ नये. आधी एक वेटिंग रूम तयार करावी. जे ओळखीचे नाव आहेत, त्यांनाच प्रवेश द्यावा.
चौकट
“ऑनलाइन क्लासमध्ये ‘पॉर्न’ व्हिडिओ व्हायरल होत असतील तर संबंधित शाळांवर शिक्षण खात्याने कारवाई करावी. ऑनलाइन शिक्षणापेक्षा वेगळा पर्याय शाळांनी निवडायला हवा. मोबाईलच्या रेडिएशनमुळेही मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. यापेक्षा शासनाने दूरचित्रवाहिनीवर शैक्षणिक धडे सुरू करावेत.”
- दिलीपसिंग विश्वकर्मा, महापेरेंट असोसिएशन
-