दावडी : निमगाव खंडोबा ( ता खेड ) येथे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला दि. २२ रोजी दुपारी भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले. कालव्याचे पाणी शेतात पाणी घुसल्यामुळे पिके वाहून गेली आहे. तसेच रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतुक ठप्प झाली होती.
चासकमान धरणाचा डावा कालवा निमगाव दावडी या परिसरातुन पुढे शिरूर तालुक्यात जातो. सध्या कालव्याद्वारे ३५० क्यूसेक्स व भीमा नदी ५०० क्यूसेक्स ने चालू आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निमगाव खंडोबा येथे अचानक डावा कालवा फुटला. कालवा फुटल्यामुळे कालव्यातील पाणी शेतात घुसले. शेतातील पिके वाहून ओढ्याला मोठा पुर आला होता. तत्काळ निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे पाटील, दशरथ शिंदे यांनी धरण व्यवस्थापनाकडे संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. धरण व्यवस्थापनाने धरणातुन डाव्या कालव्याला सोडण्यात आलेले पाणी बंद केले. कालव्या फुटल्यामुळे निमगाव येथे कारभारी वस्ती येथील दावडी - निमगाव रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सुमारे चार तास दोन्ही बाजुची वाहतुक ठप्प झाली होती. धरण विभागाचे आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.