विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमानिमित्त एकशे दहा जणांवर कायदेशीर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:13 PM2018-12-26T20:13:44+5:302018-12-26T20:31:12+5:30
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध कलमांतर्गत १०६ जणांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तसेच ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
कोरेगाव भीमा ( आव्हाळवाडी) : पेरणे फाटा / कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी एक जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन अनुयायी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या हद्दीतील एकशे दहा जणांवर विविध कलमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दल,पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, लोणीकंद पोलीस यांनी ३१डिसेंबरपासून या कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . मानवंदनेसाठी एक जानेवारी रोजी लाखो अनुयायी येत असल्याने, परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक नागरिक ,पोलीस मित्र,ग्रामपंचायत, उद्योजक आदींचे वाहतुक नियोजनासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध कलमांतर्गत १०६ जणांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तसेच ६ जणांना ताब्यात घेतले आहे. परिसरात सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविणे,जातीय भावना दुखावणे आदी प्रकारांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले. परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत. पुणे जिल्हा अधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक हे एक जानेवारी निमित्त दररोज परिस्थितीची समक्ष भेट देऊन माहिती घेत आहेत. लोणीकंद व शिक्रापूर पोलीस ,पोलीस पाटील ,पोलीस मित्र,ग्राम सुरक्षा जवान, यांचे बारकाईने लक्ष देत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.