Pune: कोरेगाव भीमात बिबट्या व शेतकऱ्याची झटापट, शेतकरी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 09:13 AM2023-10-23T09:13:04+5:302023-10-23T09:16:19+5:30
डिग्रजवाडी येथेही नारायण गव्हाणे हे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने त्यांनी गाडीचा वेग वाढवल्याने ते बचावले...
कोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा परिसरात नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना शुक्रवारी सायंकाळी शेतात पिकांना पाणी देत असताना बिबट्याने शेतकऱ्यावर झडप मारल्याने बिबट्या व शेतकऱ्याच्या झालेल्या झटापटीत आनंद किसन फडतरे हे जखमी झाले. डिग्रजवाडी येथेही नारायण गव्हाणे हे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने त्यांनी गाडीचा वेग वाढवल्याने ते बचावले.
आनंद फडतरे हे २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी शेतात पिकांना पाणी देत असताना शेजारील शेतातून बिबट्याने अंगावर झडप मारली. यावेळी आनंद फडतरे यांनी आरडाओरडा करत बिबट्याशी झटापट केली असता बिबट्या शेतात पळून गेला, दरम्यान जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले तर, घटनेची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना मिळताच वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे, चालक अभिजित सातपुते, शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली. शेतकऱ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी किरकोळ जखमी झाला असल्याने जखमी शेतकऱ्यावर कोरेगाव भीमा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांनी सांगितले.