पुणे : बिबट्या करमाळ्यात (जि. सोलापूर) धुमाकूळ घालत आला आहे. आता तो माळरानात गेल्याने तिथे त्याची दहशत पसरलेली आहे. बिबट्याने अनेकांचा बळी घेतल्याने त्याला नरभक्षक म्हटले जात आहे. पण तो हल्ला दबा धरून करतो की, घाबरून करतो? माणसांवरच हल्ला करतोय का ? जर तो असेच करतो? असेल, तरच तो नरभक्षक समजावा. त्यामुळे बिबट्यांचे निरीक्षण, नोंदी आणि मग निष्कर्ष काढणे गरजेचे आहे, अशी माहिती माजी वन अधिकारी व वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या काही दिवसांपासून करमाळा बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे दोनशेहून अधिक लोकं दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत चाळीस ट्रॅप कॅमेरे, पंधरा पिंजरे, शार्पशूटर, शस्त्रधारी पोलीस, श्वान पथक असे सर्व साहित्य असूनही बिबट्या हाती लागत नाही. कारण तिथे उसाचे शेत आणि केळीचे बागा आहेत. त्यात तो शोधता येत नाही. कुकडोलकर म्हणाले, ‘‘वन विभागाने आता बिबट्यांच्या आणि एकूण वन्यजीवांबाबत धोरण ठरवावे. बिबट्या आपला अधिवास सोडून इतरत्र फिरतो आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर भाग हा बिबट्यांचे प्रजोत्पदनाचे केंद्रच बनले आहे. त्यामुळे तिथून बिबटे इतर ठिकाणी जात आहेत. सोलापूर, मराठवाड्यात बिबटे नव्हते. आता तिकडेही ते जात आहेत. कारण तिकडे ऊसाची शेती खूप आहे. त्यांचे राहण्याचे ठिकाणच ऊस झाले आहे. ऊसामध्येच ते वाढत आहेत.’’
वन विभागाने उसाच्या क्षेत्राची ठेवावी नोंदएखादा बिबट्या लोकांवर हल्ला करत असेल, तर तो भीतीपोटी करत असू शकतो. त्यामुळे बिबट्याबाबत सखोल निरीक्षण, नोंदी आणि त्यानंतर निष्कर्ष काढून अहवाल केला पाहिजे. त्यानंतर धेारण आखावे. उसाचे क्षेत्र नेमके कुठे आणि किती आहे ? याची नोंद वन विभागाने ठेवावी. तिथून मग बिबट्यांचे स्थलांतर पुन्हा त्यांच्या अधिवासात कसे होईल, यावर भर हवा.
...तर बिबट्याला गोळ्या घाला ! बिबट्यांचे अधिवास शोधून ते घोषित करावेत. त्या अधिवासाच्या बाहेर जर बिबट्या दिसला, तर त्याला गोळ्या घालाव्यात. पण, यासाठी अगोदर वन्यजीव धोरण हवे. त्यांचा अधिवास संरक्षित हवा, त्यांना खाद्य मिळायला हवे. तरच हा वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकतो, असे कुकडोलकर यांनी सांगितले.