बिबट्याने केला शेतकऱ्याचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:13 AM2021-08-25T04:13:59+5:302021-08-25T04:13:59+5:30
बाळासाहेब वाळुंज हे घरातून लगत असलेल्या गोठ्यातील गाईंना चारा घालण्यास व दूध काढण्यासाठी पहाटे साडेपाचच्या वेळी जात असताना ...
बाळासाहेब वाळुंज हे घरातून लगत असलेल्या गोठ्यातील गाईंना चारा घालण्यास व दूध काढण्यासाठी पहाटे साडेपाचच्या वेळी जात असताना त्यांना गोठ्यालगत बिबट्या दिसला. अचानकपणे या बिबट्याने वाळुंज यांचा पाठलाग केला. प्रसंगावधान राखत त्यांनी लगतच्या कालव्याचे चारीच्या रस्त्याने आरडाओरडा करत पळ काढला. पुढे दोनशे मीटर अंतरावर त्यांना या रस्त्याने येणारे दोघेजण दिसले. सर्वांनी आवाज दिल्याने अखेर बिबट्याने बाजूच्या शेतात धूम ठोकली.
काल सोमवारीही आळे आगरमळा येथे एक मुलगा शेतात शेळीसह बकऱ्या चारावयास नेत असताना अचानकपणे बिबट्याने या बकऱ्यांवर हल्ला करत एक बकरा ठार केला व आज बिबट्याने शेतकऱ्याचा पाठलाग केल्याने आळेफाटा व परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येते. वडगाव आनंद येथील चौरेमळा व परिसरात बिबट्याची दहशत बऱ्याच दिवसांपासून आहे. त्यांचे हल्ल्यात पाळीव प्राणी ठार होत असून रात्री व पहाटे तो दिसत असल्याने व नागरिकांचा पाठलाग करत असल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी बाळासाहेब वाळुंज यांनी केली आहे.