हिंजवडी (पुणे) : आयटी नगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, नेरे दत्तवाडी येथील उसाच्या शेतामध्ये बिबट्याचे पिल्लू आढळून आले. सकाळी साडेआठच्या सुमारास स्थानिक शेतकरी शांताराम जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना हे पिल्लू भेदरलेल्या अवस्थेत आढळून आले.
स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागाला कळविले असून, पिल्लाची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून नेरे दत्तवाडी परिसरामध्ये बिबट्यांचा अधिवास आढळून आलेला आहे. आजतगायत परिसरातील अनेक भटकी कुत्री, पाळीव जनावरे यांना बिबट्याने टार्गेट करून फडशा पाडला आहे. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे बिबटे अनेक वेळा फिरताना आणी शिकार करताना कैद झाले आहे. मात्र सीसीटीव्हीत वारंवार कैद होणारे बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात कधी कैद होणार? हा प्रश्न नेरे दत्तवाडीतील ग्रामस्थ विचारत आहेत.
नेरे परिसरात ऊस शेतीचे प्रमाण अधिक आहे, उसाच्या शेतामध्ये वारंवार बिबट्या ची पिल्ले आढळून येत आहेत. त्यामुळे, बिबट्या नर, मादीचा परिसरामध्ये वावर असल्याच्या शक्यतेने, शेतीची कामे करताना स्थानिक ग्रामस्थ घाबरत आहेत. वनविभागाने परिसरामध्ये पिंजरा लावून येथील बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी राहुल जाधव, लक्ष्मण जाधव, स्वप्नील गायकवाड बाळासाहेब जाधव, दत्ता जाधव, तेजस जाधव यांनी केली आहे.