दावडी : परिसरात गेले सहा महिन्यापासून बिबट्याच्या धुमाकूळ सुरु होता, गेल्याच महिन्यात एका बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले होते. आज पहाटे चार वाजता अजून एक बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला. दावडी परिसरात होरे,डुंबरे,खेसे,या ठिकणी बिबट्याने दहशत घातली होती. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा या बिबट्याने फडशा पाडला होता. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
या परिसरात अजून तीन बिबटे असल्याचे सरपंच संभाजी घारे व शेतकऱ्यांनी सांगितले. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या नर जातीचा असून ५ ते ६ वर्षांचा आहे. त्यांची रवानगी माणिकडोह येथे बिबट्या निवारण केंद्र या ठिकाणी करण्यात आली असल्याचे वनरक्षक सुषमा चौधरी यांनी सांगितले.
दावडी गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून कायमस्वरूपी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे ,उपसरपंच राहुल कदम, आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.