संगमनेर (ता. भोर) येथील डोंगर परिसरात संतोष मारुती ढेबे हे शेतकरी जनावरे चारून घरी परतत असताना झुडपांमध्ये लपून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला. यामध्ये वासराचा मृत्यू झाला आहे. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. घटनेची खबर वन विभागाला मिळताच वनपाल अरुण डाळ व वनरक्षक गणेश जगदाळे घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
शेतातील कामे करण्यास मजूर मिळेना. हातावर पोट भरणारे देखील भीतीपोटी घरीच राहणे पसंत करीत असल्याचे अमोल कोंडे यांनी सांगितले. सचिन बांदल म्हणाले की, जंगले (वने) कमी होऊ लागल्याने जंगली प्राणी अन्नाच्या शोधात पाळीव प्राण्यावर हल्ले करीत आहेत, वणवे न लावता वन परिक्षेत्रात झाडे लावून त्याची जोपासना करणे गरजेचे आहे.
संबंधित शेतकरी ढेबे यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याची माहिती नसरापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव यांनी दिली.
संगमनेर ( ता.भोर ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू.
छाया - स्वप्नीलकुमार पैलवान