चला स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपणाचे शतक करू या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:07+5:302021-07-16T04:09:07+5:30
पुणे : क्रिकेट खेळताना कोट्यवधी लोक ते पाहत असतात. आपल्याला खेळाडूचे शतक कधी होईल, याची उत्सुकता असते. पण जर ...
पुणे : क्रिकेट खेळताना कोट्यवधी लोक ते पाहत असतात. आपल्याला खेळाडूचे शतक कधी होईल, याची उत्सुकता असते. पण जर आपल्यालाही शतक करता आले तर किती भारी वाटेल ना? तर मग चला आपण सर्वजण मिळून झाडांचे शतक बनवू या. त्यासाठी सर्वांनी मैदानात उतरले पाहिजे. येत्या स्वातंत्र्यदिनाला गावागावांत शंभर झाडं लावून हे शतक आपण पूर्ण करू या. असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.
१५ ऑगस्ट रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून सह्याद्री देवराई आणि सरपंच परिषद-मुंबई संघटनेतर्फे हा उपक्रम राबवत आहे. त्याला सामाजिक वनीकरण विभाग रोपं देऊन सहयोग करीत आहे. प्रत्येक गावात हे झाडांचे शतक व्हायला पाहिजे, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे, असेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.
क्रिकेट हा आपल्या सर्वांचा आवडता खेळ आहे. पण तिथे खेळणाऱ्या खेळाडूलाच शतक करण्याचा मान मिळतो. पण आता हा मान सर्व लोकांना मिळण्याची संधी आहे. गावात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा, शाळेतील जागा, मंदिराच्या परिसरात जागा असतात. तिथं झाडं लावून आपण स्वातंत्र्यदिनी झाडांचे शतक करायचे आहे. त्यामध्ये गावातील भजनी मंडळे, गणेश मंडळ, विद्यार्थी अशा सर्वांनी सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले.
-------------------
जुनी खोडं किती?
गावात जुनी माणसं असतात. त्यांच्या अनुभवाचा लाभ आपल्याला होत असतो. पण जुनी झाडं, खोडं किती असतात. त्यांची संख्या वाढवायची आहे. झाडं लावून ती जपायची आहेत. तरच भविष्यात त्यांचा लाभ आपल्या भावी पिढीला होईल.
--------------
आपली झाडं, देशी झाडं लावा
आपण देशी झाडं लावावीत. त्यांना वाढवावं. हे सर्व आपल्यासाठीच उपयोगी ठरणार आहेत. अशी झाडं लावणाऱ्यांचा सन्मान ‘सह्याद्री देवराई’कडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी पुढं येऊन आतापासून तयारी करायला हवी.
- सयाजी शिंदे, सह्याद्री देवराई
----------------