येरवडा : सध्या कोरोनामुळे सर्वांना आरोग्याचे महत्त्व समजले आहे. प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावेत. त्यासाठी आत्मनियंत्रण व जीवनाचे शिक्षण प्रत्येकाला असणे आवश्यक आहे, तरच आपण कोरोनावर मात करू शकू, असे मत हरियाणा राज्याच्या वित्त आयोगाचे सल्लागार प्रा.एम.एम. गोयल यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रमाच्या अमृत महोत्सव आगाखान पॕॅलेस येथील कस्तुरबा गांधी समाधीस्थळी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला, तेव्हा गोयल मार्गदर्शन करताना बोलत होते.
भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, सांस्कृतिक मंत्रालय विभागाकडून नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सोल डान्स अॕकॕॅडमीच्या कलाकारांनी नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अकॅडमीचे संस्थापक संजय उर्फ सनी गाडे यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना नेहरू युवा केंद्राचे पुण्याचे प्रमुख यशवंत मानखेडकर म्हणाले, तरुणांनी स्वातंत्र्यसंग्रामाचा अमृत महोत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा करावा. खऱ्या अर्थाने हीच आपली राष्ट्रभक्ती होईल व स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झालेल्या वीरांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
यावेळी पुरातत्त्व विभाग कार्यालयीन प्रमुख राजेंद्र यादव, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सेवा योजनाचे विभागीय संचालक डी. कार्तिकीयन, डॉ.सविता कुलकर्णी, ग्रामीण तंत्रज्ञान संस्थाचे गीताराम कदम, जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्षा उषा पाटील, तसेच सिद्धार्थ चव्हाण, माहिती विभागाचे उपसंचालक राजेंद्र सरस, डॉ.हेमांगी मोरे आदी उपस्थित होते.
-------------------------
फोटो ओळ - भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात आगाखान पॕॅलेस येथे उपस्थित मान्यवर.
Attachments area