शिकवायचं बघू नंतर... आधी खिचडी शिजवा, सर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:01+5:302021-07-16T04:09:01+5:30
शिक्षक जुंपले सरकारी कामात : विद्यार्थी वाऱ्यावर, शिक्षणाचा खेळखंडोबा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजविणे, मुलांना ...
शिक्षक जुंपले सरकारी कामात : विद्यार्थी वाऱ्यावर, शिक्षणाचा खेळखंडोबा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजविणे, मुलांना वाटप करणे, कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण, लाॅकडाऊनमध्ये चेक पोस्टवर ड्युटी करणे, मुलांची आधारकार्ड तयार करून घेणे, शाळा खोल्यांची बांधकाम व रंगरंगोटी यासारखी अनेक कामे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना करावी लागत आहेत. यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मात्र परिणाम होत आहे.
शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना न्यायालयाने शिक्षण अधिकार अधिनियम २७चा हवाला दिला आहे. यात शिक्षकांना प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या व सरकारी शाळांमधील शिक्षकांना तर शिकवणे सोडून इतरच अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
------
- जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा - ३६४८
- एकूण शिक्षक - ११५३४
------
जिल्हा परिषद व सरकारी शाळेतील शिक्षकाची कामे
- हॉटस्पॉट असलेल्या गावात दररोज करून सर्वेक्षण करणे.
- कोविड हॉस्पिटलला रुग्णांची नोंद घेणे ऑनलाईन माहिती भरणे.
- लसीकरणासाठी लोकांचे रजिस्ट्रेशन करणे व ऑनलाईन माहिती भरणे.
- चेक पोस्टवरती ड्युटी करणे.
- रेशनिंग दुकानावरती दुकानदार वाटप व्यवस्थित करतो का नाही ते पाहणे त्याच्या नोंदी करणे.
- स्वयंपाक व मदतनीस मानधन कमी असल्याने शिजवण्याचे काम करण्यास माणसे उपलब्ध होत नाही.
- जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शाळेत शिपाई व लेखनिक नसल्याने ही सर्व कामे शाळेतील शिक्षकांना करावी लागतात.
- आधार कार्ड विद्यार्थ्यांची काढण्यासाठी त्यांना बोनाफाईड देणे तसेच पालकांची संपर्क साधणे बँकेत खाते उघडणे या सर्व गोष्टीसाठी पालकांना सहकार्य करावे लागते.
- तसेच शालेय बांधकाम, शौचालय बांधकाम, संरक्षण भिंतीचे काम, बांधकाम रंगरंगोटीची कामांवर लक्ष ठेवणे व करून घेणे.
------
एकशिक्षकी शाळेत अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष
एकशिक्षकी व द्विशिक्षकी शाळेवरती शिक्षकांना तांदूळ व धान्य उतरवून घेणे ,तसेच शिजवलेल्या मालाची ऑनलाईन माहिती भरणे, मासिक देयके तयार करणे, स्वयंपाकी व मदतनीस यांच्यावर संनियंत्रण ठेवणे, ही सर्व कामं शिक्षकांनाच करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा वेळ भरपूर वाया जातो.
----------
पोषण आहारासाठी सेंट्रल किचन पद्धत राबवा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व शिक्षकांना अध्यापनात पुरेसा वेळ मिळावा म्हणून आंबेगाव तालुक्यात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यासाठी सेंट्रल किचनची उभारणी करण्यात आलेली असून , त्याच धर्तीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनद्वारे पोषण आहार पुरविण्यात यावा. यामुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ वाचेल व पोषण आहाराचा दर्जाही चांगला राहील.
- सचिन रघुनाथ तोडकर, अध्यक्ष, आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ
--------