राम कदमांवर कायदेशीर कारवाई करा : खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 07:39 PM2018-09-10T19:39:03+5:302018-09-10T19:40:08+5:30
मुख्यमंत्री महोदय..आपणास हे खुले पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर येतेय ही खरतर खुप खेदाची बाब आहे..
बारामती : मुलींचे अपहरण करण्याची भाषा जाहिरपणे बोलणाऱ्या राम कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे खुले पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
खासदार सुळे यांनी लिहीलेल्या पत्रानुसार, आपणास हे खुले पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर येतेय ही खरेतर खुप खेदाची बाब आहे. आपल्या पक्षाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या कार्यक्रमात जी मुक्ताफळे उधळली. ती संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली.
दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या तरुणांच्या गर्दीत हे आमदार महाशय, ‘मुलींना प्रपोज करा, ती नाही म्हणाली तर तुमच्या आईवडिलांना घेऊन माझ्याकडे या. तुमचे आईवडील हो म्हणाले तर त्या मुलीला पळवून आणून तुमच्यासोबत तिचे लग्न लावून देईन’ असे जाहीरपणे म्हणाले. यावर कहर म्हणजे आपले विधान चुकीचे आहे. त्यावर समाजातून सर्वच स्तरातून टिका होतेय, असे दिसूनही ते माफी मागण्यास तयार नव्हते. अहंकाराला सत्तेचं कोंदण मिळालं की असा निगरगट्टपणा जन्माला येतो.
सभ्य समाजातील कोणालाही मान्य होणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांना पाठीशी घालणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत? जर त्या शक्ती सत्ताधाऱ्यांशी संबंधित असतील तर ही बाब गंभीर आहे. वाढती गुन्हेगारी आणि रोडरोमियोंचा सुळसुळाट यांमुळे राज्यातील मुली सुरक्षित राहिल्या नाहीत हे वास्तव आहे. गृहमंत्रालयाने अशा वृत्तींवर अंकुश ठेवणे गरजेचे असते. परंतु गृहमंत्री म्हणून आपणास तशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. परिणामी राज्यातील गुन्हेगारी वृत्ती सुखाने नांदत आहे. मुलींबाबत अश्लाघ्य टिपण्णी करणाऱ्यांना बळ मिळतेय.
आपणास माझी विनंती आहे. कृपया अजूनही वेळ गेलेली नाही. मुलींचे अपहरण करण्याची भाषा जाहीरपणे बोलणाऱ्या राम कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन आपल्या सरकारमध्ये रामशास्त्री बाणा आहे , हे दाखवून द्या. जनतेचा कायद्याच्या राज्यावर विश्वास बसावा. यासाठी ही कृती आवश्यक आहे. आपण यावर तत्काळ कार्यवाही कराल, अशी मला अपेक्षा आहे. असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.