दि.३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात आदिवासी भागातील शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळून देणाऱ्या हिरडा पिकाचे मोठे नुकसान झाले. हिरड्याच्या नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र नुकसानभरपाई मिळाली नाही. या वेळी इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली, मात्र हिरड्याची मिळाली नाही.
ही नुकसानभरपाई मिळावी यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शासनाला जाग यावी यासाठी किसान सभेने घर तेथून पत्र हे अभियान सुरू केले व याला आदिवासी शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
किसान सभेच्या माध्यमातून तालुका व जिल्हास्तरावर या विषयावर मोठे आंदोलन आयोजित करण्याचे पूर्वनियोजित होते, परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन तूर्तास स्थगित करून घर तेथून पत्र हे अभियान राबवण्यात आले. याव्दारे हिरडा नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी, हिरडा झाडांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कराव्यात, आदिवासी विकास महामंडळाकडून हिरडा खरेदी केंद्ो सुरू व्हावीत अशी मागण्या करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार दि. २३ मार्च या शहीद दिनाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांनी आपली ही मागणी, पत्राच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनी आपली मागणी पोस्टकार्डवर लिहून पोस्टाच्या माध्यमातून रवाना केली. या पत्र अभियानाचे समनव्य आंबेगाव तालुका किसान सभा समितीचे कृष्णा वडेकर, राजू घोडे, अशोक पेकारी,अशोक जोशी, सुभाष भोकटे, रोहिदास गभाले यांनी केले होते.
- हिरड्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी घर तेथून पत्र या अभियानाव्दारे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविताना आदिवासी शेतकरी हिरड्याची नुकसानभरपाई मिळावी यासाठी घर तेथून पत्र या अभियानाव्दारे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र दाखवताना आदिवासी शेतकरी.