पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेची काठिण्यपातळी चांगलीच वाढली असून भावी शिक्षकांना परीक्षेत गणित, इतिहास व बाल मानसशास्त्र विषयाचे प्रश्न सोडवताना चांगलाच घाम फुटला. त्यामुळे शिक्षक होणे आता सोपे राहिले नाही, असे बोलले जात आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ४ लाख ६८ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४४३ परीक्षा केंद्रावर पेपर क्रमांक १ साठी राज्यातील २ लाख ५४ हजार ४२८ विद्यार्थ्यांच्या तर पेपर क्रमांक २ साठी २ लाख १४ हजार २५० विद्यार्थ्यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
टीईटी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर अवघड गेला. तसेच काहींना इतिहास व बाल मानसशास्त्र विषयाचा पेपर सोडवताना प्रश्न अवघड वाटले. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच अभ्यासक्रमावरील प्रश्न परीक्षेत विचारले जातील, असे परीक्षा परिषदेकडून सांगितले जात असले तरी फारच अवघड प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले, अशा प्रतिक्रिया टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्या.
एसटी संपाचा परीक्षेवर परिणाम नाही-
टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीचा संप गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले बाबत कल्पना होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी खाजगी किंवा वैयक्तिक वाहनांच्या वापर करून नियोजित वेळेत परीक्षा केंद्र गाठले.
आता तयारी अभियोग्यता परीक्षेची-
परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल येत्या दीड महिन्यात जाहीर करण्याचा प्रयत्न परिषदेतर्फे केला जाणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणा-या भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा येत्या फेब्रुवारी महिना अखेरीस घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तत्पूर्वी टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना अभियोग्यता परीक्षा देता येईल.
पुणे जिल्ह्यातील टीईटी परीक्षेची आकडेवारी-
पेपर क्रमांक १ : ५१ परीक्षा केंद्रावर २१ हजार २२५ विद्यार्थीच्या परीक्षेचे नियोजन
पेपर क्रमांक २ : ४६ परीक्षा केंद्र आणि १८ हजार ६६५ विद्यार्थीच्या परीक्षेचे नियोजन
पुणे जिल्हा | उपस्थित | अनुपस्थित | एकूण |
पेपर क्र. 1 | 16 हजार 906 | 4 हजार 319 | 21 हजार 225 |
पेपर क्र. 2 | 15 हजार 418 | 3 हजार 447 | 18 हजार 865 |
एकूण | 32 हजार 324 | 7 हजार 766 |
टीईटी परीक्षात गणित विषयातील प्रश्न अवघड होते. केवळ बीएड चा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवणे शक्य नव्हते. नेट किंवा सेट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गणित विषयाचे प्रश्न सोडवू शकतील अशी या प्रश्नांची काठीण्य पातळी होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयाचा पेपर अवघड गेला.
- गायत्री जोशी, विद्यार्थी
परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे नियोजन उत्कृष्ट केले होते.गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेपेक्षा या वर्षाच्या परीक्षेची काठिण्यपातळी जास्त होती. इतिहास व बाल मानसशास्त्र या विषयांच्या प्रश्नांची काठिण्य पातळीही अधिक होती.
- मेघा शिर्के, विद्यार्थी