पुणे : अलका चित्रपटगृहाच्या चौकातून सुरू होणारा लक्ष्मी रस्ता संपतो तो थेट अल्पना चित्रपटगृहाच्या पुढे असणाऱ्या नाना चावडी चौकात. सुमारे ३ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावरची मुख्य बाजारपेठ कुलकर्णी पेट्रोल पंप ते सोन्यामारुती चौकापर्यंत आहे. या एवढ्या भागातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथावर मिळून तब्बल ३०० विक्रेते, पथारीवाले आहेत.या सर्वांकडे पालिकेचा अधिकृत परवाना आहे. पूर्वी कधीतरी ज्या वेळी पदपथांवरून चालणे व खरेदी करणे दोन्ही सोयीचे होत असेल, त्यावेळी हे परवाने दिलेले असतील, आज मात्र त्याची पादचाऱ्यांना अडचणच होत आहे. या विक्रेत्यांच्या हक्कावर गदा न आणता त्यांचे दुसरीकडे पुनर्वसन करता येणे शक्य आहे. मात्र पालिका त्याचा विचारही करायला तयार नाही. किमान त्यांना पदपथ न अडवता त्यांचा माल लावून विक्री करायला लावणे आवश्यक आहे, मात्र त्याकडेही पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.विक्रेत्यांनी निम्मे पदपथ अडवले आहेत तर काही ठिकाणी पथारीवाले पदपथाचा निम्यापेक्षा जास्त भाग अडवून बसले आहेत. त्यांचे ग्राहक त्यांच्याभोवती थांबून खरेदी करीत असतात. त्यामुळे पदपथावरून पायी चालत येणाऱ्यांना त्यांच्या आजूबाजूने वाट काढत जावे लागते. विक्रेते नाहीत त्याठिकाणी दुकानदारांनी त्यांचा माल पदपथावर लावून ते अडवले आहेत. या गर्दीच्या रस्त्यावरून पायी चालणाऱ्यांची मात्र अडचणच होत आहे. विक्रेत्यामुळे हक्काच्या पदपथावरून चालता येत नाही व रस्यांवरून वाहने जात असल्यामुळे रस्त्यावरूनही जाता येत नाही. त्यातच या रस्त्यावर दुचाकी वाहनांच्या पार्किंगचे प्रमाण बरेच आहे. सम-विषम तारखेप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूने पदपथाला अगदी लागून वाहने लावली जातात. त्यामुळे त्या बाजूने पायी चालणाऱ्याला थेट रस्त्यावरच येऊन चालावे लागते. लक्ष्मी रस्त्यावर पायी चालता येणे अशक्य झाले आहे.
पदपथावर विक्रेत्यांना पालिकेचाच परवाना
By admin | Published: May 12, 2016 1:39 AM