पुणे : रात्रीचा शिळा भात खायला दिल्याच्या कारणावरून भांडण झाल्याने पत्नी माहेरी गेली होती. तिला आणायला गेलेल्या जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.
सुनील नारायण वाघमारे (वय ४९, रा. बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. संजय प्रेमानंद देढे (वय २७, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनेत जखमी झालेला मित्र नितेश दीपक कांबळे (वय २४, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) याने बिबवेवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी पोलीस हवालदार संजय पुणेकर यांनी मदत केली. २३ एप्रिल २०१५ रोजी रात्री दहाच्या सुमारास बिबवेवाडी येथील संघर्ष मित्र मंडळ चौक येथे ही घटना घडली. दुपारी घरी जेवायला गेल्यानंतर रात्रीचा शिळा भात खायला दिल्याने संजय चिडला होता. या कारणाने झालेल्या भांडणावरून त्याची पत्नी नेहा (वय २१) माहेरी गेली होती. संजय मित्र नितेशसह तिला आणण्यासाठी रात्री सासुरवाडीला गेला होता. त्यावेळी सुनील याने चाकूने संजय याच्या पोटात, छातीवर ठिकठिकाणी वार करून त्याचा खून केला. फिर्यादींना मांडीवर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुनीलसह मयताची सासू लक्ष्मीबाई, मेहुणा शिवम आणि मयताची पत्नी नेहा हिच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने सासरा सुनील याला खुनाच्या कलमानुसार जन्मठेप आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्नच्या कलमानुसार पाच वर्षे सक्तममजुरीची शिक्षा सुनावली. त्याला दोन्ही शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत.