प्रेमबाईच्या मुलीवर आयुष्यभर प्रेमाचा वर्षाव : सुशीलादेवी बंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:42+5:302021-08-25T04:16:42+5:30

बालपणीच्या आठवणींना उजाळा बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, आम्ही आठ भाऊ-बहिणी. मी सर्वात मोठी. दोन नंबर निर्मला. त्यानंतर ...

Lifelong love for Prembai's daughter: Sushiladevi Bomb | प्रेमबाईच्या मुलीवर आयुष्यभर प्रेमाचा वर्षाव : सुशीलादेवी बंब

प्रेमबाईच्या मुलीवर आयुष्यभर प्रेमाचा वर्षाव : सुशीलादेवी बंब

Next

बालपणीच्या आठवणींना उजाळा

बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, आम्ही आठ भाऊ-बहिणी. मी सर्वात मोठी. दोन नंबर निर्मला. त्यानंतर भाऊ सुरेशदादा, रमेश आणि सतीश. त्यानंतर दोन बहिणी ऊर्मिला, ज्योत्स्ना आणि सर्वात लहान भाऊ चंद्रकांत. दुर्दैवाने हे तिघेही आज हयात नाहीत. या सर्वांनी मला प्रेमाने वागविले. आम्हा भावंडांत मस्ती असायची, पण कधी रुसवा-फुगवा नव्हता. बॉंडिंग असल्याने कधी रुसले असे मला तरी आठवत नाही. सुरेशदादा स्वभावाने कडक तरीही प्रेमळ आणि जबाबदारीने वागत असे. रमेशमध्ये सेवाभाव ओतप्रोत असून त्याला कधी काही सांगायचे झाल्यास आम्हाला विचार करावा लागत नसे. सतीश हा दोन्ही भावांपेक्षा अधिक हुशार आणि डॅशिंग, गप्पिष्ट. असे तिन्ही भावांचे स्वभाववैशिष्ट्य आहे. बहीण स्वर्गीय ज्योत्स्ना तर माझ्या मुलीसारखीच.

आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार

आई-वडिलांबाबत त्या म्हणाल्या, वडील गांधीवादी विचारांचे, खंबीर पण तापट होते. शिस्तप्रिय होते. बीजाचे रोपटे जसे बनते त्याप्रमाणे त्यांनी आमच्यावर संस्कार केले. आई उत्तम गृहिणी होती. त्याचबरोबर विणकाम, भरतकाम आणि मेहंदी, गोटा कामात त्या काळात त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हते. वडिलांना शिक्षणाची आवड होती. परंतु परिस्थिती नसल्याने त्यांनी अतिशय कष्ट उपसले. शाळेसमोर गोळ्या विकून शिक्षण घेतले तसेच इंग्रजी वृत्तपत्र वाचून स्वतःला घडविले. त्यांना कधी बेशिस्त चालत नसे. खोटे बोललेले आवडत नसे. खरे तर आमचे घर हे एक गुरुकुलच होते. वडील विमा व्यवसायात असल्याने सतत फिरतीवर असायचे आणि आई गृहिणी असल्याने कामात असायची. त्यांच्यात वाद किंवा मतभेद झालेले मला दिसले नाहीत. वडिलांच्या कामाने प्रभावित होऊन उद्योगपती बिर्ला शेठजींनी त्यांना मोनोग्राम भेट दिला होता. आईने कधी आम्हा भावंडावर कधीच हात उगारला नाही. आज मी आहे ती केवळ आईमुळेच. भावंडात सर्वात जास्त प्रेम कुणावर होते? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, सर्वांवरच प्रेम होते. परंतु आमचा एक लहान भाऊ चंद्रकांत होता. तो ११ वर्षांचा असताना देवाघरी गेला. शेंडेफळ असल्याने त्याच्यावर थोडे जास्तच प्रेम होते.

माझे वडील भिकमचंदजी, हे विमा व्यावसायिक. तेथून यशस्वी उद्योजकापर्यंतचा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा होता. केवळ तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर एक लोकप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांनी राजकारणात नाव कमावले. त्यामुळे आमच्या घरी नेहमी सर्वसामान्यांची वर्दळ असे. सदैव दरबार भरलेला असे. अशा व्यस्ततेमुळे माझे वडील

केवळ तीन मिनिटांत भोजन करायचे. त्यांच्याकडून अशीच दरबाराची परंपरा पुढे चालत आली. सुरेशदादांनी वडिलांचा हा वारसा अगदी योग्य प्रकारे चालवला.

आठव्या वर्षी स्वावलंबी जीवनाचे धडे

शिक्षण आणि बालपणच्या आठवणीत रमलेल्या सुशीलाबाई बंब म्हणाल्या, ७७ वर्षांपूर्वी मुलींना शिक्षण दिले जात नसे. अशा काळात मला वडिलांनी स्वावलंबी जीवन कसे जगायचे याचे धडे देण्यासाठी, राजस्थान येथील वनस्थळी येथे मी ८ वर्षांची असताना होस्टेलमध्ये पाठवले. तेथे त्याकाळी, शिक्षणाबरोबरच, मैदानी खेळ, हॉर्स रायडिंग, स्वयंपाक त्यांचे शिक्षण दिले जात होते. तब्बल तीन वर्षे मी तेथे राहिले. याच काळात माझा साखरपुडा झाला. वनस्थळी येथे शर्ट आणि पायजमा घालावा लागत असे. अशा वेषात मला माझे भावी पती ईश्वरदास यांनी पाहिले.

मेरे सामनेवाले खिडकी में ...

साखरपुडा झाल्यानंतर तीन वर्षांनी आमचे लग्न झाले. यादरम्यान, मला पाहायची आणि भेटायची इच्छा पती ईश्वरदास यांना तेव्हा झाली. तेव्हा वडिलांनी स्पष्ट नकार दिला. कारण तशी पद्धत त्या काळी नव्हती. एके दिवशी, माझ्या माहेरी जळगावला, राहणाऱ्या वडिलांच्या एक मित्राकडे त्यांनी, मला मुलीला पाहायचे आहे, असा आग्रह धरला. अखेर त्या मित्राने आमची भेट घडवून आणली. मी जेथे राहायचे त्या समोर असलेल्या घराच्या खिडकीत ईश्वरदास उभे राहिले आणि आम्ही राहत असलेल्या घराच्या खिडकीत मी उभी राहिले. ही आमची पहिली भेट. जणू हा प्रसंग ''मेरे सामनेवाले खडकी में एक चांद का तुकडा रहता है!' 'याप्रमाणेच होता.

मुलगा होईपर्यंत थांबायचे नाही...

लग्नानंतर मी, सासरी पुण्यात राहायला आले. तेव्हा मी अल्लड होते. लग्न, संसार याची तशी काहीही जाण नव्हती. घरकामाचा गंध नव्हता. पण, सासूबाईंनी मला सांभाळून घेतले आणि सर्व काही शिकविले. एक चांगले कुटुंब मला मिळाल्याचा मला अभिमान आहे. पती ईश्वरदास हे प्रॉपर्टी व्यवसायात होते. ते संयमी, हुशार आणि व्यवहारकुशल होते. सासरी जॉइंट फॅमिली होती. त्यामुळे २५ ते ३० लोक होते. त्यामुळे प्रचंड काम असायचे. नंतर आम्ही संसारात रमलो. मला सहा मुली आणि एक मुलगा झाला. एकापाठोपाठ मला मुली झाल्या. पण , मुलगा होईपर्यंत थांबायचे नाही, ऑपरेशन करायचे नाही, असा निर्धार मी केला. लोक आणि नातेवाईक म्हणायचे यांच्या मुलींचे कसे व्हायचे? तेव्हा सासूबाईंनी धीर दिला, सांभाळून घेतले. त्या म्हणाल्या काळजी करू नको. मलाच पाच अपत्यं आहेत. तुझ्या मुली चांगल्या घरात नांदतील. विशेष म्हणजे त्यांचे बोल आणि आशीर्वाद आज खरे झाले आहेत.

इंग्रजी शिक्षण, डबल प्रमोशन आणि ड्रायव्हिंग

तीन मुली झाल्यावर, मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी, मला इंग्रजी शिक्षण घेण्याची इच्छा झाली. घरकामात वेळात वेळ काढून मी शिक्षण घेतलेच, शिवाय या शिक्षणाचा मुलांनाही फायदा करून दिला. त्याचा कसा फायदा झाला हे सांगताना, रमणबाग शाळेतील एक वर्ग प्रमोशनचा किस्सा सांगितला. या शाळेत, माझ्या दिराच्या मुलाला अॅडमिशन नाकारली. त्याच मुलाला मी जिद्दीने डबल प्रमोशन मिळवून दिले. प्रथम शाळेने त्याला प्रवेश नाकारला तेव्हा, शाळेला मोठी देणगी देणारे आम्ही सर्वजण राजस्थानीच आहोत, अशा शब्दांत मी संबंधितांना खडसावले. तेव्हा कुठे प्रवेश मिळाला. मात्र त्याच वेळी, आता तुम्ही शाळेत गुरं सोडली, असे अनुद्गार मला ऐकवले गेले. त्याला उत्तर देताना मी त्या शिक्षकांना सांगितले की, पुढच्या वर्षी तुम्ही पाहा. विशेष म्हणजे माझ्या त्याच पुतण्याला चक्क ८० टक्के मार्क पडले. त्यामुळे, चांगली एक इयत्ता बढतीही मिळाली. तेव्हा शाळेने, त्या शिक्षकांनी माझे कौतुक केले. त्याकाळी उत्कृष्ट गुण मिळाल्यास जंपिंग प्रमोशनची पध्दत होती.

शिक्षणाबरोबर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण १९६०-६२ मध्ये घेतले. मुलांना शाळेत सोडता यावे, या उद्देशाने ते घेतले कारण अनेकदा ड्रायव्हर वेळेवर यायचे नाहीत. त्यामुळे खोळंबा टाळण्यासाठी हा निर्णय घेतला, असेही त्या म्हणाल्या.

तू आहेस म्हणून मला कशाची काळजी नाही

पती ईश्वरदास आणि माझ्यात किरकोळ प्रसंग वगळता, कधी वाद झाला नाही, हे सांगताना त्या म्हणाल्या, तू आहेस म्हणून मला कशाची काळजी करायचे कारण नाही, असे ते नेहमी म्हणायचे. त्यांनी कधीही कुणाचे उणेदुणे काढले नाही. ते गप्पीष्ट, मिश्कील स्वभावाचे होते. कॉफी हाऊस आणि नंतर रामकृष्ण हॉटेल येथे जायला त्यांना फार आवडायचे. कॉफी घरात करून देते म्हटले तर ते म्हणायचे, कॉफी तिथल्यासारखी नक्की मिळेल, पण तसे वातावरण तू घरी देऊ शकणार नाहीस. व्यावसायिक तसेच सामाजिक कामे तेथेच ठरवली जात असत.

मला सिनेमा पाहण्याची आवड होती. मात्र, ते म्हणायचे, तीन तास त्यांचं कोण ऐकत बसणार? त्यामुळे, मुलींबरोबर मी अनेकदा सिनेमा पाहायला जात असे. आजही तो परिपाठ सुरू आहे.

यूएलसी कायदा आला आणि होत्याचे नव्हते

आमच्या जीवनात १९७४ ते १९७८ चा काळ अतिशय कठीण होता. यूएलसी कायदा आला आणि होत्याचे नव्हते झाले. तेव्हाच आमचे कुटुंब विभक्त झाले. अशा प्रसंगी संसार अतिशय काटकसरीने करून आम्ही आहे त्यात समाधान मानले. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केली.

सासू-सून या नात्यात दुरावा कधी आला नाही. मी मोठी असल्याने नेहमी पालकाच्या आणि जबाबदारीच्या भूमिकेत वावरले. दुधावरील साय असलेले माझे दोन नातू दिगंत आणि आयुष नेहमी मला दादी या नावाने हाक मारतात. आता संसारात काही करायचे राहिलेले नाही. मी तृप्त आहे. वाचन, अध्यात्मात मी रमते. खरेच, मी पृथ्वीवर राहून स्वर्गात राहत असल्याची अनुभूती घेत आहे.

..............................,........,,

चौकट

जावईबापूंना आवडते माझ्या हातचे थालपीठ

माझ्या सर्व बहिणी आणि भावांना मी बनविलेले मसालेदार पदार्थ खूप आवडतात. त्यातही, मटर, उसळ आणि थालीपीठ म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे मलाही त्यांना हे पदार्थ तयार करून खाऊ घालण्यात एक वेगळाच आनंद मिळतो.

आईच्या निधनानंतर, रत्नाभाभी आणि मधुभाभी यांनी आम्हाला ती उणीव भासू दिली नाही. विशेष म्हणजे त्यांच्यानंतरच्या पिढीनेही आम्हाला तेवढेच प्रेम आणि सन्मान दिला.

आम्ही चारही बहिणी तर जणू मैत्रिणींप्रमाणेच वागलो. ज्योत्स्ना तर मला आईच मानत. मुलगी आणि आईचे नाते आमच्यात होते. त्या नात्याने, जावईबापू विजयबाबू दर्डा तर मला मोठ्या मुलासारखेच आहेत. त्यांना, थालीपीठ फारच आवडते आणि तेही केवळ माझ्या हातचे. जेव्हा केव्हा आले तेव्हा त्यांनी माझ्याकडे थालिपीठाचा आग्रह धरला. एकदा तर सारखं सारखं थालिपीठ कशाला करायचे म्हणून मी पंचपक्वान्नं केली. तेव्हा त्यांनी थालिपीठ आणि चटणी सोडून इतर सर्व जिन्नस नाकारले. आमच्या परिवारातील, एका लग्नात तर त्यांनी लग्नातील पक्वान्न सोडून आपल्या संवगड्यासह माझ्या हातचे थालिपीठ खाल्ले. अजूनही येतात तेव्हा थालिपीठच मागतात. खाण्यापिण्याबाबत अतिशय चौकस असणाऱ्या विजयबाबूंच्या प्रेमाची ऊर्जा मला आजही चविष्ट थालिपीठ तयार करण्याची प्रेरणा देते.

Web Title: Lifelong love for Prembai's daughter: Sushiladevi Bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.