वायसीएम रुग्णालय जिवावर उदार

By admin | Published: April 18, 2016 03:02 AM2016-04-18T03:02:09+5:302016-04-18T03:02:09+5:30

चिंचवड, फुलेनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी आकाश विनोद गायकवाड या तरुणाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ल्यातील या तरुणाला वायसीएममध्ये वेळीच

Lifting the YCM hospital | वायसीएम रुग्णालय जिवावर उदार

वायसीएम रुग्णालय जिवावर उदार

Next

पिंपरी : चिंचवड, फुलेनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी आकाश विनोद गायकवाड या तरुणाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ल्यातील या तरुणाला वायसीएममध्ये वेळीच उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे इतरत्र धावपळ करावी लागली. त्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप आकाशच्या नातेवाइकांनी केला आहे. केवळ आकाशच नाही, तर गेल्या काही महिन्यांत वायसीएमच्या कारभाराबद्दल अनेकांनी संतप्त तक्रारी नोंदवल्या आहेत. एकेकाळी गरिबांसाठी वरदान ठरणारे वायसीएम रुग्णालय आता जीवघेणे ठरू लागले असल्याचे कटू अनुभव व्यक्त होत आहेत. वायसीएमची रुग्णसेवा ढासळल्याचे मत पोलीस अधिकारीही व्यक्त करू लागले आहेत.
भांडण, मारामारीच्या घटनांमध्ये गंभीर जखमी रुग्णांना जेव्हा वायसीएममध्ये नेले जाते, तातडीक विभागात दाखल केले जाते, त्या वेळी दोन ते अडीच तास रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत ठेवले जातात. तातडीने उपचार करण्याची गरज असताना, मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्णाला वेळीच उपचार मिळत नाहीत. रात्रीच्या कामाची सर्व काही जबाबदारी सीएमओवर सोपवून रुग्णालय व्यवस्थापन झोपी जाते. रात्री अत्यंत गरज असताना, एकही सर्जन उपलब्ध होत नाही. कधी भूलतज्ज्ञ, तर कधी दुसरेच शिकाऊ डॉक्टर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. चार दिवसांपूर्वी प्रसूतीनंतर आलेल्या एका महिलेचा वायसीएममध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा घटना एकापाठोपाठ घडू लागल्या आहेत. आकाशला उपचारासाठी नेले, त्या वेळी वेळीच उपचार सुरू झाले नाहीत. आकाशला अन्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला वायसीएमच्या डॉक्टरांनी दिला. एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र तेथे अनामत रक्कम भरण्याची परिस्थिती नसलेल्या आकाशच्या नातेवाइकांना त्याला नाईलाजास्तव ससून रुग्णालयात न्यावे लागले. शनिवारी ससूनमध्ये आकाशचा मृत्यू झाला. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करणाऱ्या नातवाइकांनी वायसीएम रुग्णालयाबद्दल रोष व्यक्त केला आहे.
वार झाल्याने गंभीर जखमी महिलेला शनिवारी रात्री दहाला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी पोलिसांना वायसीएम रुग्णालयातील परिस्थिती अनुभवास आली. महिलेच्या मानेवर, तसेच पोटावर मोठ्या जखमा असताना, वायसीएम रुग्णालयाची यंत्रणा संथगतीने कार्यरत होती. खुनी हल्ल्यातील, तसेच अपघातातील जखमींच्या वेळी ही परिस्थिती अनुभवास येते असे नाही, आजारांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या रुग्णांना अनेकदा अशाच अनुभवांना सामोरे जावे लागते आहे. वायसीएममध्ये आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. (प्रतिनिधी)

वायसीएम नको रे बाबा!
वायसीएम रुग्णालयाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही. महापालिका आयुक्तांना रुग्णालयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. प्रमुख वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षक यांची सुधारणा घडवून आणण्याबद्दल उदासीनता आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी फोनवर उपलब्ध होत नाहीत. कायम संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश मोबाइलवर ऐकू येतो. रुग्णांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून फोन उचलला जात नाही. त्याच्यावर तोडगा काढणे तर दूरच राहिले. अशा कितीतरी कटू अनुभवांना नागरिकांना सामना करावा लागतो. त्यामुळे वायसीएमला जाण्याचे टाळले जात आहे.
वायसीएम रुग्णालयामध्ये यापूर्वी उपचार घेतलेले रुग्ण पुन्हा वायसीएममध्ये जाण्यास तयार नसतात. तिथे रुग्णांना देण्यात येणारी वागणूक योग्य नसते अशी चर्चा आहे. या ठिकाणी दाखल होताना वशिल्याच्या रुग्णाकडे जादा लक्ष दिले जाते. तर सर्वसामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत तक्रार केल्यास त्याकडेही दुर्लक्ष केले जाते.
अतिदक्षता विभागात रुग्णाला दाखल करायचे असल्यास रुग्णाची परिस्थितीपेक्षा त्याच्या वशिल्याकडे जादा लक्ष दिले जाते. त्यामुळे अतिदक्षता विभागात गरज असतानाही अनेक रुग्णांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेक जणांना मृत्यूने कवटाळले आहे.

वायसीएमची रुग्णसेवा ढासळू लागल्याच्या तक्रारी येत आहेत. मध्यंतरीच्या काळात तीन सीएमओ सोडून गेले. केवळ दोन सीएमओ काम करीत होते. त्यांच्या भरवशावर काम केले जात होते. आता सीएमओची भरती केली आहे. सर्जन, तसेच अन्य डॉक्टर टिकत नाहीत. आठवड्यातून एकदा प्रत्येक सोमवारी डॉक्टरांची मानधन तत्त्वावर भरती असते. प्रतिसाद मिळतो; परंतु रुजू झालेले डॉक्टर जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे रुग्णसेवेवर ताण येतो. त्यात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी

Web Title: Lifting the YCM hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.